अंबरनाथमध्ये ३८ एकरवर अमेझॉन उभारणार डेटा सेंटर

अंबरनाथ : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी औद्योगिकरणाचे हब असलेल्या अंबरनाथमध्ये आता जागतिक ख्यातीच्या ‘अमेझॉन'नेही प्रवेश केला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील असोदे आणि बुरडुल हद्दीतील लोढा समुहाकडून अमेझॉन डेटा सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने ३८ एकर जागा खरेदी केली आहे. या ठिकाणी अमेझॉन कंपनीचे भव्य डेटा सेंटर उभे राहणार आहे. नुकतीच या जागेच्या व्यवहाराची अंबरनाथ सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करण्यात आली असून सुमारे ४५० कोटी रुपये किंमतीच्या या जमिनीच्या खरेदीसाठी ‘अमेझॉन'कडून २७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क अदा करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात डेटा सेंटर साठी अंबरनाथची वेगळी ओळख आणि मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीत अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या या भागात येऊ पाहत आहेत. त्यासाठी ‘पाले एमआयडीसी'चाही वेगाने विस्तार करण्यात येत आहे. त्यात मुंबई आणि उपनगरात विशेषतः नवी मुंबई भागात अनेक डेटा सेंटर उभारण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यातील डेटा सेंटरचे महत्व आणि गरज पाहता तसेच अंबरनाथ आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील जागांची उपलब्धता यामुळे अनेक डेटा सेंटर या भागात येण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्याच अंबरनाथ तालुक्यातील आणि अंबरनाथ ‘आनंदनगर एमआयडीसी'च्या हद्दीत असलेल्या असोदे आणि बुरडुल या दोन गावांच्या भागात अमेझॉन डेटा सर्व्हिस सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपनी लोढा समुहाकडून अमेझॉन डेटा सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात ३८ एकर जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आला आहे. ४५० कोटी रुपये किंमतीच्या या जमीन खरेदीच्या व्यवहाराचे दस्तावेज नुकतेच अंबरनाथ सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करण्यात आले असून त्यासाठी २७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आल्याची माहिती सब-रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हायपरस्केल डेटा सेंटरची उभारणी...

अंबरनाथ जवळील या जमिनीवर हायपरस्केल डेटा सेंटर उभारले जाणार आहे. भारताच्या डिजीटल आणि कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी ‘अमेझॉन'चा सदर मोठा उपक्रम आहे. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) च्या विस्ताराचा भाग म्हणून, कंपनीने २०३० पर्यंत भारतात क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तब्बल युएस १२.७ अब्ज (सुमारे १ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘अमेझॉन'ची पूर्वीची गुंतवणूक...
अंबरनाथ मधील सदरची ‘अमेझॉन'ची मुंबईतील डेटा सेंटर बाजारपेठेतील पहिली मोठी गुंतवणूक नाही. यापूर्वी २०२३ मध्ये, ‘अमेझॉन'ने पवई येथे ‘लार्सन अँड टुब्रो'कडून ४ एकर जमीन १८ वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बगल; अधिकारी, माफिया गब्बर