नोकरीसाठी सुरक्षारक्षकाचे आमरण उपोषण
नवीन पनवेल : रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकाने १६ डिसेंबर पासून खांदा वसाहत येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आस्थापनेवर सुरक्षारक्षक पदाकरिता ड्युटी मिळण्यासाठी भूषण सातपुते (रा. तळोजा फेज-२) यांनी सदर उपोषण सुरु केले आहे.
भूषण सातपुते यांनी २०१९ च्या मंडळाच्या सुरक्षा रक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यात कर्जत (माथेरान) असा कायमस्वरुपी पत्ता नोंदवला होता. मात्र, त्यानंतर एक वर्षापूर्वी ते नोकरीनिमित्त पनवेल, तळोजा फेज-२ येथे राहण्यास आले. याची कल्पना त्यांनी अर्जाद्वारे रायगड सुरक्षा मंडळ अधिकाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी दिलेली आहे. कर्जत तालुक्यात जागा नसल्याने रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने २०२० रोजी तालुक्याबाहेरील सिडको, बेलापूर येथे त्यांना पाठवले होते. त्यानुसार सातपुते तेथे गेले असता त्या ठिकाणी कोणतीच मागणी नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवले गेले. त्यानंतर आजपर्यंत त्यांना कामावर हजर केले नाही.
ऑगस्ट २०२४ रोजी सातपुते यांना टाटा पॉवर कंपनी कर्जत या ठिकाणी मंडळाकडून निवडीसाठी पाठविण्यात आले. मात्र, या ठिकाणी मुलाखती घेऊन देखील कोणालाही निवडण्यात आले नाही. अनेक ठिकाणी प्रतिक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना कामापासून वंचित ठेवले गेले असल्याचे भूषण सातपुते यांनी सांगितले. कळंबोली मधील कॉटन कॉर्पोरेशन आस्थापनेत एका सुरक्षा रक्षकाची जागा रिक्त असल्याचे सातपुते यांनी सचिवांना सांगितले असता त्यांनी शिफारस पत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार शिफारस पत्र आणून दोन वेळा कंपनीतून मंडळाकडे मेलद्वारे मागणी करुन देखील तेथील सुरक्षा रक्षकाची जागा रिक्तच आहे. मात्र, त्या ठिकाणी अद्याप नोकरीसाठी हजर करत नसल्याने भूषण सातपुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय-रायगड, कामगार मंत्रालय यांच्याकडे दाद मागितली. तरीही त्यांना कामावर रुजू करण्यात आले नाही.
महत्वाचे म्हणजे भूषण सातपुते यांचे लग्न जमले असून नोकरी मिळत नसल्याने त्यांचा विवाह देखील मोडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे त्यांनी १६ डिसेंबर पासून त्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत सातपुते यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, कामगार सह-आयुक्त, जन महिती अधिकारी यांना अवगत केले आहे.
सिनॅरिटी लिस्ट नुसार भूषण सातपुते यांना जॉब मिळेल. त्यांना सिलेक्शन साठी पाठवणार आहोत. कर्जत तालुक्यात मागणी आल्यावर नियमाप्रमाणे त्यांना नोकरी मिळेल.
-राजेश आडे, अध्यक्ष-सुरक्षा रक्षक मंडळ.