सानपाडा येथील ऑर्केस्ट्रा बार विरोधातील स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुर्भे : सानपाडा -पामबीच सेक्टर-१७ मध्ये सुरु होणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार (डान्स बार) विरोधातील स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यावेळी शेकडो नागरिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे हरकती पत्र दाखल करीत तीव्र विरोध नोंदविला आहे.
सानपाडा-पामबीच सेक्टर-१७ मधील प्लॉट नंबर-९ वरील दि अफेअर्स हौसिंग सोसायटी या इमारती मध्ये हौसा रेस्टॉरंट मध्ये बार आणि मनोरंजन / ऑर्केस्ट्रा (डान्स बार) चालू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे सानपाडा-पामबीच परिसरात असामाजिक कृत्य होण्याची शवयता असल्याने नियोजित ऑर्केस्ट्रा (डान्स बार) बार विरोधात स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत आणि वैजयंती भगत यांनी येथील सानपाडा-पामबीच प्रभागातील नागरिकांसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परवाना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे हरकती पत्राचे निवेदन सादर केले. त्यानंतर सकाळी ७ ते १० या वेळेत माजी नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि युवा नेते निशांत करसन भगत यांच्या उपस्थितीत प्रस्तावित ऑर्केस्ट्रा (डान्स बार) बार विरोधात सानपाडा -पामबीच येथील गुनीना मैदानाजवळ स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली.
या स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत सानपाडा -पामबीच परिसरातील मोठया संख्येने महिला, पुरुष, युवक-युवती, जेष्ठ नागरिक, खेळाडू आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सानपाडा -पामबीच येथील नियोजित ऑर्केस्ट्रा (डान्स) बारला विरोध दर्शविणारी हरकत पत्रे सादर करुन ऑर्केस्ट्रा (डान्स) बार विरोधातील लढ्यात स्वाक्षरी द्वारे आपला सहभाग नोंदविला.
यावेळी पोलीस प्रशासनाकडे जमा होणाऱ्या हरकतींची दखल घेऊन येथे डान्स बारला परवाने देऊ नये. तसेच कायद्याचे उल्लंघन करुन देण्यात आलेला मद्यपान परवानाही रहित करावा, अशी मागणी सानपाडा -पामबीच येथील नागरिकांनी केली आहे. मागणीची शासनाने नोंद न घेतल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करण्याचा निर्धार सानपाडा -पामबीच मधील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
‘डान्स बार हटावो, सोनखार -पामबीच की प्रतिष्ठा बचाओ..!
डान्स बार भगाव , सोनखार -पामबीच की संस्कृती बचाव..!, अशी घोषणाबाजी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम मध्ये केली.