औद्योगिक वसाहतीला भंगार माफियांचा विळखा?

वाशी : नवी मुंबई शहरातील ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ'च्या कोट्यवधी रुपयांच्या मोकळ्या भूखंडांवर भंगार विक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ लागले असून, प्लास्टिक पिशव्या तसेच भंगारांच्या इतर वस्तूंचे ढीग या ठिकाणी साचू लागले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीला बकालपणा आला आहे.

नवी मुंबई शहराच्या पूर्व दिशेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत येथील स्थानिक शेतकऱ्यांची जमीन संपादित करुन औद्योगिक वसाहत वसवण्यात आली. मात्र, एमआयडीसी तर्फे संपादित केलेल्या जमिनीचा १००टक्के वापर न झाल्याने आणि जागा संरक्षित न केल्याने त्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आजमितीस ‘एमआयडीसी'ची ४०० एकर जागा अतिक्रमित असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

औद्योगिक वसाहत मधील मोकळ्या भूखंडांवर आता भंगार माफियांनी कब्जा केला आहे. दिघा, ठाणे-बेलापूर रोड, खैरणे, पावणे, तुर्भे, शिरवणे आदी भागात भंगार माफियांनी जागा अतिक्रमित करुन स्वतःचे बस्तान मांडले असून, यातील गोदामे उच्च वीजवाहिनी खाली आहेत. दुसरीकडे काही भंगार गोदामात ज्वलनशील पदार्थ देखील हाताळले जातात. त्यामुळे भंगाराच्या गोदामात आग लागलो तर आजूबाजूच्या परिसराची मोठी हानी होऊ शकते.त्यामुळे भंगार गोदामांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरु लागली आहे. याबाबत एमआयडीसी महापे प्रादेशिक कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नोकरीसाठी सुरक्षारक्षकाचे आमरण उपोषण