नवी मुंबईला मंत्री लाभल्यामुळे समस्या सुटण्याची आशा

नवी मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या ‘महायुती शासन'च्या मंत्रीमंडळात नवी मुंबईतून गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागल्याने गेली १० वर्षे मंत्री पदापासून दूर राहिलेल्या नाईकांचा मंत्रीपदाचा वनवास आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे मंत्री झाल्यावर आता तरी नवी मुंबईच्या समस्या सुटतील, असा आशावाद नवी मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी गत ५ वर्षात नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे शेकडो बैठका घेण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे आता त्यांना आयुक्तांच्या दालनात नवी मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही.  

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी घरे नियमित करणे, ‘सिडको'कडून नवी मुंबई महापालिकेला उद्याने, शाळा, नागरी आरोग्य केंद्र, रुग्णालय, महिला सक्षमीकरण केंद्र, अग्निशमन केंद्र, वाचनालय, व्यायामशाळा, जलउदंचनकेंद्र आणि मनउदंचनकेंद्र, आदि नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नोडनिहाय भूखंड हस्तांतरीत करणे, करार पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी महापालिकेत समाविष्ट करणे, ‘बीएमटीसी'च्या १५८७ कामगारांना १०० चौरस फुट क्षेत्रफळाचे गाळे देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, आदि विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आगामी काळात सदर विषय मार्गी लागतील, अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.

याशिवाय नवी मुंबईतील पार्किगची आणि वाढत्या अतिक्रमणांची समस्या या शहराच्या नियोजनाला मारक ठरत असल्याने त्यावर त्वरीत नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी ‘सिडको'कडून १२५ कोटी रुपये नवी मुंबई महापालिकेला लवकरात लवकर वितरीत करुन घेणे, तुर्भे - खारघर रस्ते प्रकल्प आणि ऐरोली-काटई रस्ते प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान मंत्री म्हणून गणेश नाईक यांच्यासमोर राहणार आहे. तसेच ‘स्वच्छ नवी मुंबई' सोबतच नवी मुंबई शहर अंमलीपदार्थ मुक्त करण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे.  

दरम्यान, ‘भाजपा'मध्ये प्रवेश करण्यापूर्वी गणेश नाईक यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार'च्या काळात मंत्रीपद भूषविले आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा'मध्ये गेलेल्या मंदाताई म्हात्रे यांच्याकडून त्यांना सुमारे १२०० मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे २०१४ ते २०१९ पर्यंत ते विधानसभेची पायरी चढू शकले नाहीत.  

तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस'मधून थेट ‘भाजपा'मध्ये प्रवेश केला आणि ‘ऐरोली'मधून ‘भाजपा'च्या तिकिटावर ते आमदार झाले होते. परंतु, २०१९ मध्ये ‘महाविकास आघाडी'चे सरकार सत्तेत आल्यामुळे मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न हवेतच विरुन गेले. परंतु, ‘आघाडी सरकार'च्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ‘शिवसेना'चे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे आघाडी सरकार गडगडले आणि भाजपा ‘शिंदे सेना'सोबत पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार आपल्याला मंत्रीपद मिळेल या आशेवर गणेश नाईक होते. परंतु, ‘भाजपा'ने त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यावेळी विचार न करता त्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवले. मात्र, विद्यमान ‘महायुती सरकार'च्या मंत्रीमंडळात ‘भाजपा'ने त्यांचा समावेश केल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

२७ गावातील पाणीप्रश्न सोडवा