पत्रपुराण...

माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या चुकीचं प्रायश्चित्त घेतलं, म्हणजे तो माणूस म्हणून संबोधण्याच्या लायकीत बसतो. जे या संज्ञेत नसतात ते आपल्या चुकांचं कसंही समर्थन करत असतात. मी नाही त्यातली...असं त्यांचं वर्तन असतं. पण, दुधपित्या मांजरीलाही परिजनांची भीती असतेच.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात दादा यांना ती आता अधिक सतावू लागली असण्याची शवयता आहे. यामुळेच मी कसा योग्य, इतकं सांगण्यासाठी त्यांना आटापिटा करावा लागतो आहे.

बुडत्याचा पाय खोलात गेला की तो बाहेर येण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असतो. संकटच ते. संकटातून बाहेर पडण्यासाठी मग आसपासच्या लोकांना आणाभाका कराव्या लागतात. संकट सर्वच ठिकाणी असतं. सामाजिक जीवनात संकट आ वासून उभं असतं, तसा राजकीय आणि आर्थिक जीवनातही त्याचा फटका बसत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार देखील संकटात सापडल्याचं दिसतं. गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी करून त्यांनी आपल्यावरच्या संकटाला वाट मोकळी करुन दिली. संकट दूर करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला विकास पर्वाची आठवण करुन देणारं पत्र लिहिलं आहे. त्यांचं पत्र बाहेर आल्यापासून या पत्राचा राज्यातील जनता शोध आणि बोध घेत आहेत. पत्र दादांनी कोणासाठी आणि का लिहिलं याविषयीही लोकांमध्ये कुतूहल आहे. जनतेमध्ये राहून अहोरात्र राज्यसेवा करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहावंसं वाटावं यातच त्यांच्या ‘कर्तृत्वा'चा ठसा दिसून येतो. त्यांच्या व्याख्येत विरोधी पक्षांना आता स्थान राहिलेलं नाही. विरोधी पक्षांमध्ये बसून राज्याची कामं होतं नसतात, असा दावा त्यांच्या या पत्रात आहे. तो अफलातून आणि तितकाच तो स्वतःचा बचाव करणारा आहे. राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी राहिलेला नेता त्याच पदाला आता पारखा का मानतो, ते देखील कळेनासं झालं आहे. जगाचा विकास सत्तेतून होतो, असे तत्वज्ञान दादांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं खरं. पण, मग विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा वाहिलेले धोंडिबा भंडारे, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, प्रतिभाताई पाटील, शरद पवार, मृणालताई, अहिल्याताई, दि.बा.पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी आदी वेड्याघरचे पाहुणे होते की काय?. या मंडळींना अक्कल नसावी म्हणून त्यांनी राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळली?. विरोधी पक्षनेते पदामुळे राज्याच्या विकास साधता येत नसल्याचं या मंडळींच्या मनाला कधी शिवलं नाही. आज ते अजित पवार यांना वाटावं याचं आश्चर्य आहे. या मान्यवरांना विरोधी पक्षात राहून स्वकल्याण करता आलं नाही, इतकं मात्र खरं. मात्र, त्यांनी याला कधीच महत्व दिलं नाही. तरीही ते आपल्या मतदारसंघात कायम लोकप्रिय राहिले.  दादांचं राजकारण वेगळं. मालमत्ता आणि संपत्तीशिवाय नेतेपदाला अर्थ नाही, असं सूत्र दादांच्या नव्या राजकारणात चपलख बसतं. संपत्तीपासून जपून राहायचं असेल तर सत्तेत सहभाग घेण्यावाचून पर्याय नसतो, जो पर्याय या मान्यवरांना कधीच निवडावा लागला नाही. भाजपच्या सत्तेत झोप छान लागते, असं सूत्र हर्षवर्धन पाटील यांनी आधीच सांगितलं आहे. दादांची उडालेली झोप नव्या सत्तेत सामील झाल्याने निर्धास्त बनली आहे. तेव्हा त्यांनी निवांत झोप घ्यावी, उगाच विकासाच्या गप्पा मारु नयेत.  

मधली अडीच वर्षं वगळता दादा राज्याच्या सत्तेत कायम आहेत. सत्ताधारी आमदार म्हणून ते केवळ सत्तेत नव्हते असं नाही तर कायम उपमुख्यमंत्री आणि त्यातच अधिकतर अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. इतक्या मोठ्या जबाबदारीवर असतानाही त्यांना राज्याच्या विकासाची आता आवश्यकता वाटावी, इतकं काही कमी नाही. आजवर झाला नाही तो विकास दादांना आता ‘भाजप'च्या सत्तेत राहून साधायचा आहे. फुटलेल्या शिवसेना बरोबर आणि ज्यांनी आपल्याला सिंचनाचा वाटेकरी म्हणून धरणातल्या पाण्याची कायम उपमा दिली त्या भाजपबरोबर सत्तेत का गेलो, इतकं सांगण्यासाठी त्यांना अख्खं पत्र कारणी घालावं लागलं. या सत्तेत सहभागी होऊन जुलै महिन्यात दादांना एक वर्ष पूर्ण होणार आहे. मग सत्तेत सहभागी होताना असले पत्रोद्योग त्यांनी का टाळले?, लोकांचा विश्वास नव्हता की तो ढळला म्हणून पत्राचाराची आवश्यकता पडली?,  पहाटेच्या शपथविधीवेळी दादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथेवेळीच दादांच्या ‘कर्तृत्वा'ची जाणीव जनतेला झाली होती. इतकं अफाट ‘कर्तृत्व' दाखवूनही महाविकास आघाडीने त्यांना आपलंसं केलं. सत्ता आली आणि दादा पुन्हा उप मुख्यमंत्री झाले. तेही अर्थमंत्री पद घेऊन. भीक नको पण कुत्रं आवर... असं म्हणण्याची वेळ तेव्हा आघाडीच्या नेत्यांवर दादांनी आणली. दादांना पुन्हा पद द्यायला तेव्हा अनेकांचा विरोध होता. संकट नको, म्हणून आपला विरोध त्यांनी म्यान केला. असा अनेकदा खजिना ताब्यात येूऊनही राज्याचा विकास साधणं दादांना जमलं नाही, ते आता त्यांनी आपल्या पत्रातून कबूल केलं, असंच म्हणता येईल.

फडणवीस यांच्या सत्तेबरोबर दादा का गेले, ती काही आता उघड करण्याची गोष्ट राहिलेली नाही. महाराष्ट्राचं राजकारण जाणणाऱ्या जगातल्या प्रत्येकाला ते ठावूक असताना दादांनी पत्रप्रपंच का करावा?. स्वविकास आणि राज्यविकास, अशी सत्तेची दोन स्वतंत्र फलितं आहेत. सिंचन मंत्री असताना दादांनी स्वविकास केल्याचा ठपका तेव्हा भाजप नेत्यांनी ठेवला होता. ७० हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप तेव्हा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यासाठी त्यांनी खटारेभर पुरावे दिले होते. पहाटेची सत्ता आली आणि सारे पुरावे बाळगंगेत बुडाले. एकनाथ शिंदेंरुपी सत्तेची दारं उघताच बाळगंगेत बुडालेले पुरावे पुन्हा बाहेर आले आणि कोणाला कळायच्या आत विरोधी पक्षनेते असलेले दादा ‘भाजप'च्या मांडीवर जाऊन बसले. तेव्हा दादांनी उगाच विकासाच्या नावाखाली काहीही खपवण्याची आवश्यकता नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात धरुन राजकारणात आलेल्या अजित पवार यांना आता अपघाताने राजकारणात आलो, असं वाटू लागलं आहे. इतिहास विसरणारे भविष्य घडवू शकत नाहीत, असा निसर्गाचा नियम दादा विसरलेले दिसतात. महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण इतकं शुचिर्भूत आणि प्रामाणिक झालंय असंच जणू दादांना सांगायचंय. श्रीकांत जिचकार यांसारखी एक-दोन नावं वगळली तर एकही कार्यकर्ता आपल्या सग्यासोयऱ्याच्या अशीर्वादाशिवाय राज्याच्या राजकारणात प्रवेश करुन टिकला नाही. अजित पवार यांच्या पाठीशी तर शरद पवार यांचा कायम हात होता. शरद पवार यांना डावलून आघाडी सरकारमध्ये आपण राज्याचं उपमुख्यमंत्री पद मिळवलं, असं दादांचं म्हणणं असेल तर ते विसरभोळे तरी असावेत किंवा ते जनतेलाही वेडे समजत असावेत. शरद पवार यांनी पक्ष नेतृत्वापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दादांची झालेली अवस्था कोणीही विसरु शकत नाही. तेव्हा राज्याच्या राजकारणात अपघाताने आल्याचं सांगून ते लोकांना फसवतात. याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या कार्यपध्दतीची तुलना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपध्दतीशी केली. या दोघांच्या कामाशी स्वतःची बरोबरी करण्याची हिंमत या सत्तेतल्या एकालाही जमलेली नाही. सारी कपटे करुनही देवेंद्र फडणवीस देखील मोदी-शहांशी स्वतःची तुलना करत नाहीत. ज्यांनी केली त्यांची गत काय झाली, ते भाजपवाले सांगतील. दादांच्या या पत्राचाराने दादांच्या समर्थकांची कोंडी झाली असल्यास नवल नाही. दादांचे आताचे पाठीराखे असलेल्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मात्र हायसं झालं असेल. या पत्ररुपाने आपल्यावरचे आरोप आणि आरोपांसाठी भाजपच्या तक्रारबहाद्दरांचं गाऱ्हाणं कमी झालं तरी या दोघांना पुरेसं आहे. - प्रविण पुरो,ज्येष्ठ पत्रकार 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्रीराम हे आगळे वेगळे..त्यांच्यासारखे दुसरे कुणीच नाही