रौद्र निसर्गदेवतेला प्रसन्न करून घेणारे वीर!
सपाट जमिनीवरून हे अवजड रणगाडे शत्रूला समजणार नाही अशा रीतीने वर पोहोचवायचे..मग हल्ला करायचा! कागदावर, मनात,कल्पनेत किती सोपे..एका वाक्यात काम! रणगाडे त्या उंचीवर नेण्यात यश मिळवायचे असेल तर चमत्कारच करून दाखवावा लागणार होता...आणि तो चमत्कार भारतीय सैन्याने केला व घाम आणि रवताचा अभिषेक करुन लडाख हा भारतीय प्रदेश भारतातच आणण्यात यश मिळवले.
जोजिला पास अर्थात खिंड...म्हणजे एका पहाडातून दुसऱ्या पहाडाकडे जाण्यासाठी असलेला अगदी निमुळता रस्ता..नव्हे पायवाट. जोजिला ही इथली ऋतू देवता. ही खिंड काश्मीर ते लडाख अशी वाट तिच्या उरात मिरवते. जोजिला तशी रागीट स्वभावाची... कोपली तर तिच्याकडे दयेचा लवलेश मिळत नाही. उंची आणि तेवढीच भयावह खोली..कडेलोट झाला की संपलं!
त्या भागात तसा बाराही महिने गारठा असला तरी थंडीचा विशेष ऋतू असतोच...बर्फाचे साम्राज्य!
या काळात इथल्या जगाचा इतर जगाशी संपर्क ठप्प होतो. म्हणून ही विशेष थंडी सुरू होण्याआधी जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवाव्या लागतात...अगदी मीठही मिळणार नाही नंतर.
ऑक्टोबर महिना सुरू होत होता... नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी सुरू होईल...रसद येणे अशक्य होऊन जाईल. आणि जोजिला खिंडीवर शत्रूचा पक्का ताबा आहे. पाकिस्तानी सैन्य आणि टोळीवाले लुटारू बंडखोर लडाखमध्ये भारतीय मुंगीलाही शिरू देण्यास तयार नाही अशी स्थिती. स्वतंत्र भारताच्या सैनिकांचा हा पहिलाच युद्ध अनुभव होता. इथे तैनात असलेली फौज आणि जनता लवकरच उपासमारीची बळी ठरणार हे दिसत होतं...कारण रसद मार्ग पूर्ण बंद होता. राजधानी लेह आता भुकेने व्याकुळ होऊ लागली होती...लवकरच काहीतरी आणि अपूर्व असे करायलाच पाहिजे होते. पण पराजय डोळ्यांना स्पष्ट दिसत होता!
पाकिस्तान वरून गंमत पाहत निवांत बसला होता..मन मानेल तेंव्हा आणि त्याठिकाणी अचूक गोळीबार करू शकत होता. एकदा का भारतीय सैन्य इथून मागे हटले की हा संबंध भूभाग पाकिस्तानचा होणार...!
१/११ गोरखा बटालियनचे मोजके सैनिक युद्धाच्या धामधुमीत इथे घाईने एअर लिपट करून आणून ठेवले होते..कारण पुरेसा वेळ हातात नव्हता... गोरख्यांच्या जोडीला जम्मू काश्मिर राज्य दलाचे काही सैनिकही होते तिथे. चिवटपणा रक्तात भिनलेले गोरखा प्राणपणाने लढत तिथे तग धरून राहिलेले होते...पण सैन्य पोटावर चालतं...अन्न, औषधं, शस्त्रं हाताशी असेल तरच सैन्य उभं राहू शकतं! आणि नेमका हाच पुरवठा बंद करण्यात, रोखून धरण्यात पाक यशस्वी होताना दिसत होता. जोजिला खिंड भारताच्या ताब्यात असायलाच पाहिजे..अन्यथा पहिली लढाई..आणि पहिला पराजय जणू निश्चीत!
भारतीय पायदळाने कित्येक हल्ले चढवले होतेच..पण मोक्याच्या ठिकाणी बसलेला शत्रू तिथून मागे सरकत नव्हता. त्यावेळी मेजर जनरल असलेले के.एम. करिअप्पा काळजीत होते..आणि या काळजीतून त्यांनी एक अशक्यप्राय कल्पनेला जन्मास घातले. साडे अकरा फूट उंचावर असलेल्या या युद्धभूमी नव्हे, युद्ध शिखरावर रणगाडे उतरवायचे.. वाटेत उंच कडे, खडक, बर्फ, दऱ्या आणि वरून शत्रूचा अखंड अग्निवर्षव होत असताना....जगाच्या इतिहासात हे तोवर झाले नव्हते आणि पुढेही होण्याची शक्यता नव्हती!
त्या स्थितीमध्ये असे करणे हा शुद्ध वेडेपणा दिसत होता आणि होताही!
पण या वेड्या निर्णयाला शहाणपणात रुपांतरित करण्याची जबाबदारी १६१, इन्फंट्री ब्रिगेडच्या ब्रिगेडियर के. एस. थिमय्या यांच्या जोजीला फोर्सच्या खांद्यावर आली. थिमय्या साहेबांनी या वेडेपणात यशाची बीजे दडलेली पाहिली! या मोहिमेचे बारसे करण्यात आले... ऑपरेशन बायसन! आपल्या सेनेकडे त्यावेळी एम ५ स्टुअर्ट जातीचे एम के ६ रणगाडे होते...ज्यांचे संचालन ७ व्या लाईट कॅवलरीच्या सी कंपनीकडे होते.
सपाट जमिनीवरून हे अवजड रणगाडे शत्रूला समजणार नाही अशा रीतीने वर पोहोचवायचे..मग हल्ला करायचा! कागदावर, मनात,कल्पनेत किती सोपे..एका वाक्यात काम! रणगाडे त्या उंचीवर नेण्यात यश मिळवायचे असेल तर चमत्कारच करून दाखवावा लागणार होता.
जम्मू, अखनूर येथे असलेल्या या रणगाड्यांचे विविध भाग उघडून सुटे करण्याचे काम तातडीने सुरू झाले. म्हणजे हे भाग ट्रकमध्ये भरून वाहून नेता येतील! यासाठी तीन टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले अनेक ट्रक्स आवश्यक होते.
शक्य ती सर्व गुप्तता पाळून रणगाड्यांचे सुटे भाग भरलेले हे ट्रक्स मोहिमेवर रवाना झाले. जम्मू... श्रीनगर... सोनमर्ग.. बालाटाल असा मार्ग निश्चित झाला. पण ट्रक्स धावत नव्हते... रांगत होते जणू...कारण शत्रूला जराही सुगावा लागू नये म्हणून अंधारात प्रवास करायचा होता... ट्रक्सचे मुख्य दिवेसुद्धा बंद ठेवून! रस्त्याच्या कडेला छोटे, मंद प्रकाश परावर्तित करणारे रिपलेक्टर्स लावले जात..चालक डोळ्यांत तेल घालून या प्रकाशमार्गावर ट्रक्स चालवत नेत...पीर पंजाल मधला निमुळता रस्ता, वेडा आणि वाकडा सुद्धा. एखादा इंच अंदाज चुकला की कायमचे खोल दरीत कोसळण्याचे हे निश्चित. दिवस पहिला किरण घेऊन उगवायचा त्याआधी हा काफिला जगाच्या अर्थात पाकिस्तानच्या दृष्टीआड करावा लागे. कारण दिवसा पाकिस्तानी टेहळणी विमाने घिरट्या घालीत. हे ट्रक झाडीत, पुलाखाली, आडोशाला उभे करून त्यांच्यावर छद्म आवरणे घातली जात.
सोनमर्ग येथून बालताल इथपर्यंत एक गुप्त रस्ता तयार करण्याचे काम समांतर वेळी सुरू करण्यात आले...डोंगर फोडून मार्ग कोरून काढायचा होता. मद्रास सॅपर्स सज्ज होती...मेजर आर.पी. राय, मेजर थंगराजू आणि सेना..कुदळ, फावडे घेऊन कामाला लागली. म्हणू वानरसेना! तापमान उणेपेक्षा उणे...अंधार! दगड फोडण्यासाठी स्फोट घडवून आणावे लागत..वरून त्वरित पाक भुंकायला सुरुवात करी...मग पुन्हा शांत बसायचे काही वेळ...एक अदृश्य शक्ती..एक अदृश्य मार्ग बांधत होती. फक्त याक नावाचा प्राणीच जाऊ शकेल अशा चिंचोळ्या रस्त्याचे रणगाडा जाईल असे रुपांतर करायचे होते...शत्रू गोळीबार करीत असताना! नऊ हजार फुटापासून हा रस्ता साडे अकरा फूट उंचीवर चढत गेला! हे अंतर केवळ अडीच मैल होते..पण एक एक सेंटीमीटर सत्वपरीक्षा घेत होता. एका मैलासाठी २५ टन स्फोटके वापरावी लागली..तेवढाच गोळीबार पाकिस्तान करीत होता..त्यांना समजत नव्हते की हे हिंदुस्तानी इथे नेमके कसले काम करत आहेत...कारण युद्ध तर ते हरत आले होते.. केवळ काही दिवसांचाच प्रश्न होता. लडाखचा गळा पुरता आवळला की भारताचा श्वास कोंडला जाणार होता! पण इकडे आपल्या बहादूर जवानांनी रस्ता बांधण्याची लढाई जिंकली! आता या रस्त्यावरून रणगाड्यांचे सुटे भाग भरलेले हे ट्रक्स चढवत जोजिला खिंडीपर्यंत न्यायचे! हे सुद्धा अंधारात करायचे...कुणालाही खबर लागू नये म्हणून त्या परीसरात सक्तीची संचारबंदी सर्वांनाच लागू केली गेली. या शांततेचा आवाज पाकच्या कानांत मोठ्याने गोंगाट करीत होता...ट्रक्समधील सुटे भाग तिथे उतरवून घ्यायचे, त्यांची जुळणी करायची..निष्णात इंजिनियर्स रात्रंदिन कामाला जुंपले...१ नोव्हेंबर मुहूर्त काढला गेला...याच दिवशीच्या आधीच्या रात्री प्रचंड हिमवादळ सुटले... पाकिस्तानी खुश झाले..अशा वातावरणात तर भारताच्या अडचणी वाढत जातील! पण हे भारतीय फौजेचे वादळ घोंगावत होते पाकिस्तानच्या डोक्यावर..ते निर्धास्त, बेखबर होते. पण बर्फाचे वादळ आपल्या बाजूने झाले..रस्त्यावर बर्फाची जाड चादर पसरली..सगळीकडे एकच रंग... पांढरा!
सकाळचे पहिले किरण बर्फाच्या डोंगरावरून डोकावले...१, मद्रासचे वीर पुढे झाले...हे एक आत्मघातकी पाऊल होते...कारण शत्रूवर थेट चालून जायचे होते...शत्रू पाहत असताना! शत्रूचे लक्ष भलतीकडे वेधून घ्यायचे होते...कारण एका बाजूने रणगाडे आक्रमण करणार होते!
पण पाकिस्तानने तुफान गोळीबार आरंभला....भारतीय सैनिकांच्या रक्ताने बर्फ लालेलाल होऊ लागला... पाकिस्तानी सैनिक या गोंधळात अडकले मात्र होते...आणि अचानक..केवळ याक चालू शकतील अशा रस्त्यावरून कित्येक भारतीय रणगाडे बर्फाचा पडदा फाडत फाडत पुढे मुसंडी मारून निघाले! सर्वांत पुढे रणगाडा होता लेपटनंट बी.एस. चंडेल साहेबांचा. रणगाडा मोठा आवाज करीत पुढे आला...रस्ता तयार केलेला असला तरी चढ एखाद्या उभ्या भिंती सारखा होता. ..पण हे बायसन..म्हणजे मस्तवाल रानगवे पुढे सुसाट सरकत राहिले..समोर असलेल्या पाकिस्तानी सैन्य चौक्यांत असलेल्या सैनिकांना भास झाल्यासारखे वाटले..रणगाडे आणि इथंवर? त्यांच्या प्रशिक्षणात असं कुठंच आलं नव्हतं...त्यांच्याच काय, जगातल्या कोणत्याच सैन्य अभ्यासक्रमात डोंगरावर रणगाडा ही कल्पना विरळ असावी!
पाकिस्तानने धक्क्यातून सावरत या रणगाड्यावर त्यांच्याकडच्या शस्त्रांनी गोळीबार केला...पण त्या गोळ्या या रणगाड्यांचे कवचावर आदळून उडून जायच्या... स्टुअर्ट रांगड्यावर काहीही परिणाम होत नव्हता!
या दरम्यान एका पाकिस्तानी सैनिकाने त्याच्या वरिष्ठाला संदेश पाठवला.. हिंदुस्तानी टैंक ऊपर आये है....तिकडून उत्तर आले..दिमाग खराब हो गया है क्या....याक होंगे पागल!
स्टुअर्टने आग ओकायला सुरुवात केली...३७ मिमी व्यासाची तोफ..अचूक फायर! भयंकर विध्वंस! यापेक्षाही पाकिस्तानी सैनिकांनी जणू सैतान पाहिल्यासारखे केले...आणि तिथून जीव मुठीत घेऊन ते पाकिस्तानी हद्दीकडे पळत निघाले..ही त्यांची सवय त्यांना कायमची चिकटली! भारताला जोजिला निसर्गदेवी प्रसन्न झाली होती...पण घाम आणि रक्ताचा सर्वांग अभिषेक मात्र तिने करवून घेतला होता स्वतःला! कित्येक बळी तिने घेतले होते! पण लडाख मुक्त झाले...भारतीय प्रदेश भारतात आला होता! ही मोहीम जगाच्या युद्धाच्या इतिहासात एक उदाहरण म्हणून नोंदली गेली!
१ नोव्हेंबर....याच दिवशी १९४८ मध्ये हा पराक्रम घडला...त्याचे स्मरण करूयात. ज्यांनी ही योजना आखली, प्रत्यक्षात उतरवली त्यांना नमस्कार करूया...ज्या वीरांनी प्राण देऊन देश राखला त्यांना वंदन करुयात...अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख होतो..सैनि
क अज्ञात राहतात...त्यांच्या नावांचा शोध घेऊयात! ही आणि एकूण सर्व मोहिमा मिळून भारताने ११०४ सैनिक गमावले... तीन हजारपेक्षा जास्त सैनिक जखमी झाले! (हा लेख म्हणजे एका इंग्रजी लेखाचे स्वैर भाषांतर आहे..प्रवासाच्या गोंधळात केलेले.. तपशील अनेक ठिकाणी अपुरे, चुकीचे असतीलच. अभ्यासकांनी मूळ लेख पाहावा!जय हिंद.)
-संभाजी बबन गायके