शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांची निवडणूक आरक्षण सोडतीवर हरकत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. मात्र, या आरक्षण प्रक्रियेवर आता ‘शिवसेना'ने (शिंदे गट) हरकत घेतली आहे. कल्याण पश्चिम शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी याबाबत ‘राज्य निवडणूक आयोग'कडे तक्रार केली आहे.

शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्र.३, ५ आणि १५ वर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. प्रभाग क्र. ३, ५ आणि १५ मधील आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत या तिन्ही प्रभागांमध्ये आरक्षणाची रचना समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

प्रभाग क्र.३, ५ आणि १५ मध्ये आरक्षणाचे वितरण एससी, एसटी ओबीसी आणि सर्वसाधारण घटकांमध्ये पुरेशा प्रमाणात न्याय देणारे नसून त्यात अनुचित असमानता आढळत असल्याचा पाटील यांचा आरोप आहे. सर्व प्रभागांमध्ये आरक्षणाचे योग्य संतुलन न राखल्याने काही घटकांना प्रतिनिधत्व मिळणार नाही, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे आरक्षणातील त्रुटी दूर करुन सर्व समाजघटकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्र. ३ मध्ये अ-अनु.जाती, ब-अनु. जमाती महिलांसाठी, क-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ड-सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ मध्ये अ-अनु.जाती, ब-अनु.जमाती, क-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ड-सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्र.१५ मध्ये अ-अनु. जाती महिला, ब-अनु. जमाती महिला, क-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ड-सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. यासंदर्भात आरक्षणातील पुनर्विलोकन करुन असमानता तातडीने दूर करण्याची मागणी करत तसे न झाल्यास याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही रवी पाटील यांनी दिला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आगामी निवडणुकीत ‘मविआ'च्या विजयामध्ये ‘युवा सेना'चा महत्वाचा वाटा - अनंत गीते