जुहूगाव येथील गावदेवी मैदानाची स्वच्छता अभावी दुरवस्था
वाशी : नवी मुंबई शहराला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित करुन व्यापक जनजागृती करते. मात्र, महापालिका स्वच्छता अभियान राबवित असली तरी नवी मुंबई शहरातील अनेक भाग स्वच्छतेचा अभाव असल्याने बकाल बनले आहेत. स्वच्छता अभावी वाशी सेवटर-११ मधील जुहूगाव येथील गावदेवी मैदानाची दुरवस्था झाली असून, मैदानाला बकालपणा आला आहे.
जुहूगाव येथील गावदेवी मैदानातील स्वच्छतेचा प्रश्न अतिशय चिंताजनक झाला असून, जुहूगावात कोणतेही विकासकाम सुरु झाल्यावर निघालेले डेब्रिज गावदेवी मैदानात टाकले जाते. कंत्राटदार दिखाव्यापुरते डेब्रिज उचलून बाकी राहिलेल्या डेब्रिजकडे ढुंकूनही पाहत नाही.
याशिवाय जुहूगाव येथील गावदेवी मैदानात रात्री वीजदिवे बंद असल्याने अंधार पडत असल्यामुळे गावदेवी मैदान रात्री मद्यपींचे दारु पिण्याचे ठिकाण बनले आहे. दारु पिऊन त्याच ठिकाणी दारुच्या बाटल्या टाकून दिल्या जातात. परिणामी मैदानात पडलेल्या दारुच्या बाटल्या फुटून दिवसा मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, जुहूगाव येथील गावदेवी मैदानाची नवी मुंबई महापालिकेने तातडीने स्वच्छता करुन मैदानातील वीज दिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ‘जुहूगाव ग्रामस्थ मंडळ'चे सल्लागार हिमांशु रविंद्र पाटील यांनी केली आहे.