बालकलाकारांकडून लोककलेचा महाजल्लोष

कल्याण : बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून ‘जल्लोष लोककलेचा' असा लोककला महोत्सव १४ नोव्हेंबर रोजी मराठा मंदिर हॉल कल्याण पश्चिम येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित, बालरंगभूमी परिषद कल्याण कल्याण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष रविंद्र सावंत, सांस्कृतिक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हेमंत यादगिरे, परीक्षक प्रा. विकास कोकाटे, लोककला अभ्यासक प्राध्यापक महेश थोरात, कथ्थक गुरु स्मिता मोरे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा सुजाता डांगे, प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष संजय गावडे या मान्यवरांच्या हस्ते नटराज पुजन आणि दीपप्रज्वलन करून ‘जल्लोष लोककलेचा' या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे भरभरुन कौतुक केले. लोककलेचे महत्त्व पटवून देत स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करत स्पर्धेतील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

एकल गायन या गटाने ‘महोत्सव'ची सुरुवात झाली. गोंधळ,जोगवा, शेतकरी गीत, कोळी नृत्य बघून पाहुणे प्रेक्षक भारावून गेले. सांघिक गायन, सांघिक नृत्य,एकल वादन, एकल गायन, एकल नृत्य अशा एकापेक्षा एक लोककलांचे स्पर्धकांनी सादरीकरण केले. एकल गायन, एकल वादन, एकल नृत्य सादरीकरण झाल्यानंतर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांनी बालकलावंतांशी संवाद साधत लोककलेचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन जोपासणाऱ्या लोककलावंतांचे महत्त्व आणि सादरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली. तसेच बालरंभूमी परिषद बालकलावंतासाठी अनेक उपक्रम कश्याप्रकारे राबवत आहेत, ते सांगत पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी बालकलावंतांनी मोठ्या प्रमाणात बालरंगभूमी परिषदेचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन केले.

ॲड निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते एकल गायन,एकल वादन,एकल नृत्य या तिन्ही गटातील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ येथील शिवसृष्टीचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण