कौटुंबिक न्यायालयात बालहक्कांवर प्रकाश टाकणारे ‘थोडा पॉज’ पथनाट्य सादर

नवी मुंबई : बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात बाल दिवसानिमित्त बालकांचे हक्क’ या संवेदनशील विषयावर आधारित ‘थोडा पॉज’ या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या संकल्पनेतून तालुका विधी सेवा समिती, नवी मुंबई वकील संघटना आणि टिळक महाराष्ट्र विधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

टिळक विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्राध्यापिका वर्षा बडवे आणि सहाय्यक प्राध्यापिका प्राजक्ता बालवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य सादर केले. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादांचा मुलांवर होणारा मानसिक परिणाम, तसेच अनेकदा मुलांना ‘वादाचे हत्यार’ म्हणून वागवले जात असल्याचे वास्तव या नाट्यात प्रभावीपणे मांडण्यात आले. न्यायालयाच्या प्रांगणात सादर झालेल्या या सशक्त अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमानंतर नवी मुंबई वकिल संघटनेचे अध्यक्ष सुनिल मोकल, उपाध्यक्ष संदीप रामकर, सचिव विकास म्हात्रे आणि कार्यकारी समिती यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. नाझनीन शेख यांनी केले. या वेळी विवाह समुपदेशक भारत काळे, प्रबंधक जी.एस. हिरवे, सहायक अधीक्षक राजेश म्हात्रे, लघुलेखक विजय पोटे व कुलदीप जाधव, वरीष्ठ लिपीक के.पी. किर्वे, कनिष्ठ लिपीक निलम भोसले, अक्षता कोळसुंदकर, सहाय्यक राज निकम, प्रिती नन्नावरे तसेच पोलीस कर्मचारी यांच्यासह वकील, पक्षकार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'च्या टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राची प्रशंसा