भाजप नेत्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या आगामी निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ‘भाजपा'चे नेते गुलाबराव करंजुले पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे भाजप नेते अभिजित करंजुले यांचे म्हणणे आहे.
विनायक महादेव मेजगे यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नवरे पार्क, अंबरनाथ (पश्चिम) येथील मनिकंदन हॉल येथे ‘गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान'तर्फे महिला शक्ती आनंद महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी ‘मी अंबरनाथ प्रेसिडेंट लकी ड्रॉ' या शीर्षकाखाली पोस्टर वापरण्यात आले होते.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, ‘राज्य निवडणूक आयोग'ने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या आचारसंहितेतील नियम १० (मतदारांना प्रलोभन/लाच देण्यास मनाई) आणि नियम १५ आणि १६ (निवडणुका जाहीर झाल्यावर अनुदान/घोषणा करण्यास मनाई) यांचे सदर कृतीतून उल्लंघन झाले आहे. तसेच सदर कृती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १७४ चेही उल्लंघन आहे.
याव्यतिरिक्त ११ नोव्हेंबर रोजी भास्कर नगर आणि मेटल नगर भागात भेटवस्तू वाटून मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येत होते. तसेच रात्री १० नंतर लाऊडस्पीकरचा वापर झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. भेटवस्तू वाटताना मतदारांचे मोबाईल नंबर आणि मतदान EPIC नंबर घेतले जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करुन त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीसोबत कार्यक्रमाचे पुरावे म्हणून फोटोही निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत.
या संदर्भात भाजप नेते अभिजित करंजुले यांना विचारले असता ते म्हणाले की, सदर कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. त्यात कोणत्याही पक्षाचा संबंध नाही किंवा चिन्हाचा वापर केला नव्हता. आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. या संदर्भात तक्रार असल्यास त्याचे कायदेशीर उत्तर दिले जाईल.