सिंधी समाजाची ‘आक्रोश रॅली'

उल्हासनगर : ‘छत्तीसगड क्रांती सेना'चे प्रमुख अमित बघेल यांनी ‘सिंधी समाज'चे आराध्य देव भगवान झुलेलाल यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या विरोधात उल्हासनगरमध्ये ‘सिंधी समाज'ने आक्रोश रॅली काढून तीव्र निषेध केला. या रॅलीमध्ये हजारो सिंधी बांधव सहभागी झाले होते.

सिंधी पत्रकार संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी आयोजित केलेली सदर निषेध रॅली शहरातील गोल मैदान येथील भगवती नवानी स्टेजपासून सुरु झाली. नेहरु चौक, सिरू चौक मार्गे रॅली झुलेलाल मंदिरापाशी समाप्त झाली. रॅलीदरम्यान सिंधी बांधवांनी भगवान झुलेलाल की जय आणि अमित बघेल मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे संतप्त सिंधी युवकांनी अमित बघेल यांचे पोस्टर जाळून तसेच पोस्टरला जोडे मारुन आपला संताप व्यक्त केला. सदर अपमान केवळ सिंधी समाजाचा नसून भारतीय संस्कृती आणि आस्थेचाही अपमान असल्याचे युवकांनी यावेळी सांगितले.

या निषेध रॅलीमध्ये संत साई लीलाराम, संत रिंकू भाईसाहेब, संत काली साई, संत दीपक सिरवानी, आमदार कुमार आयलानी, भुल्लर महाराज (शिंदे गट शहर अध्यक्ष), बंडू देशमुख (मनसे नेते), भरत गोंगोत्री (राकाँपा शहर अध्यक्ष), रोहित साळवे (काँग्रेस शहर अध्यक्ष), दीपू छतलानी (उभाटा) यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी आणि विविध सिंधी सामाजिक संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

भगवान झुलेलाल यांचा अपमान असहनीय आहे. सरकारने दोषींवर त्वरित कारवाई करावी. आपल्या आराध्य देवांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या बघेल यांच्या अटकेसाठी आपण स्वतः छत्तीसगडमध्ये जाऊन पोलिसांना २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे सामाजिक कार्यकर्ते सत्यम पुरी यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एमडी सिंघल यांच्या समवेत बैठक