रायगड विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाची गगनभरारी
नवीन पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा-युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने आयोजित रायगड डी.एस.ओ. शालेय क्रीडा स्पर्धेत पनवेल येथील ‘रयत शिक्षण संस्था'च्या महात्मा फुले कला, विज्ञान-वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर ३५ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई करीत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यामध्ये अन्वी राठोड हिने रायफल शुटींग प्रकारात सुवर्ण पदक, प्रथमा भगत हिने मॉडर्न पेंटॅथलॉन प्रकारात सुवर्ण पदक, वैष्णवी घरत, सानिका म्हात्रे, सारा बैकर आणि तनुजा पाटील यांनी तायक्वांदो प्रकारात सुवर्ण पदक, राज पाटील आणि अनिकेत घुगे यांनी बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक, ओंकार पाटील आणि कौस्तुभ खुटले यांनी कॅरममध्ये सुवर्ण पदक, मैदानी स्पर्धेत मुलांच्या संघाने ७ सुवर्ण पदके, मैदानी स्पर्धेत मुलींच्या संघाने १० सुवर्ण पदके, यश औटी, प्रीती मिसाळ आणि साक्षी एरंडे यांनी कराटे प्रकारात सुवर्ण पदक, विश्वजीत धोदे याने कुस्तीमध्ये सुवर्ण पदक, मुलींच्या संघाने कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक, मुलांच्या संघाने खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक, मैदानी स्पर्धेत मुलींच्या संघाने ४ रौप्य पदके, मुलींच्या संघाने डॉजबॉल स्पर्धेत रौप्य पदक, रोनक जितेकर याने वेटलिािंपटग स्पर्धेत रौप्य पदक तर मुलांच्या संघाने डॉजबॉल आणि क्रिकेट स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
या गुणवंत खेळाडुंपैकी अन्वी राठोड हिची भोपाल येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच प्रथमा भगत हिची मॉडर्न पेंटॅथलॉनसाठी, वैष्णवी घरत आणिसानिका म्हात्रे यांची तायक्वांदोसाठी तर प्रणव कटेकर याची तिहेरी उडी या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रीती मिसाळ आणि साक्षी एरंडे यांचीही कराटे स्पर्धेच्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सदर अविस्मरणीय कामगिरी आहे. या सर्व खेळाडुंनी महाविद्यालयाचा झेंडा अभिमानाने फडकवला, याचा मला विशेष आनंद वाटतो. एवढ्या मोठ्या संख्येने पदकांची लयलूट करीत महाविद्यालाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केल्याबद्दल डॉ. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.