‘एआय'मुळे अधिक तंत्रज्ञानयुक्त पत्रकारिता -ना. मंगलप्रभात लोढा

मुंबई : जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिध्दी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ‘एआय' तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे, ते लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता-नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘एआय' तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ'च्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, एआय तज्ञ किशोर जस्नानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, ‘मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघ'चे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातोसे तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार यावेळी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.

‘मंत्रालय-विधिमंडळ संघ'च्या सदस्य पत्रकारांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे अत्याधिक आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी नामदार लोढा यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र, या तंत्रज्ञानाने अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल. तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणे काम करता येईल, असे ना. लोढा म्हणाले.

प्रभावी बातमी लेखनासाठी ‘एआय' टूल्स उपयुक्त -किशोर जस्नानी
कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) साधनांचा प्रभावी वापर करुन बातमी लेखनाची गुणवत्ता अधिक वाढविता येते. यासाठी या टूल्सना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. एआय साधने कामाची गती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आहेत, असे मत एआय तज्ञ किशोर जस्नानी यांनी तिसऱ्या दिवशीच्या सत्रात मांडले.

किशोर जस्नानी यांनी एआय ट्रल्सला योग्य सूचना देण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इंग्रजीचे मराठी भाषांतर, शीर्षक लेखन, संभाषण विश्लेषण आणि प्रॉम्प्ट लेखन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

इंग्रजीचे मराठी भाषांतरासाठी ‘जेमिनी' टूल्स मराठी भाषेसाठी उत्तम असून ते अचूक व सहज भाषांतर देते. बातमी लेखनात ५डब्लू आणि १एच (व्हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय आणि हाऊ) यांचे भान ठेवून प्रॉम्प्ट तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

एका बातमीसाठी विविध प्रकारची शिर्षके तयार करता येतात. यात छापील आवृत्तीचे शीर्षक, डिजिटल माध्यमासाठीचे शीर्षक, सर्च इंजिनसाठी अनुकूल शीर्षक, त्वरित लक्षवेधी शीर्षक या प्रकारांचा समावेश असल्याचे त्यांनी शिर्षक लेखनाबाबत सांगितले. डीपसीक असे टूल्स शिर्षक तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचे जस्नानी म्हणाले.

आयडिओग्राम लिओनार्ड जेमिनी या एआय टूल्स मधून उत्तम चित्र निर्मिती करता येते. रेकार्ड संभाषणातून मुद्दे आणि तपशील टंकलिखित करण्यासाठी ऑटर एआय या साधनांचा वापर करण्यासंदर्भात प्रात्यक्षिक त्यांनी दिले. एखाद्या संभाषणात व्यत्यय असल्यास तो दूर करुन ते संभाषण योग्य पध्दतीने ट्रान्सक्राईब करण्याबाबतही त्यांनी प्राम्प्टसह मार्गदर्शन केले.

दरम्यान, ‘वार्ताहर संघ'चे सरचिटणीस दिपक भातोसे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असून या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एज्युसिटी'द्वारे नवी मुंबईची नवीन शैक्षणिक ओळख