वाहनतळ मध्ये कृत्रिम तलावातील विसर्जित श्रीगणेश मूर्ती

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मार्फत यावर्षी श्रीगणेशोत्सवात श्रीगणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्ती महापालिका तर्फे अद्यापही सीबीडी-बेलापूर येथील महापालिका वाहनतळ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन पार्किंग जागेत ठेवण्यात आलेल्या विसर्जित श्रीगणेश मूर्तींची योग्य प्रकारे व्यवस्था करण्याची मागणी सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पीओपी पासून बनविलेल्या श्रीगणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होतात. नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण होण्याकरिता यावर्षी नवी मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार पीओपी पासून बनविलेल्या श्रीगणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी १४३ कृत्रिम तलाव बांधले होते. याशिवाय पीओपी पासून बनविलेल्या श्रीगणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन महापालिका मार्फत श्रीगणेश भक्तांना करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन यावर्षी कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. यावर्षी श्रीगणेशोत्सवात कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या हजारो श्रीगणेश मूर्ती संकलित करुन महापालिका तर्फे बेलापूर येथील वाहन पार्किंगच्या जागेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.विसर्जित श्रीगणेशमूर्ती वाहनतळावरच अद्यापही पडून आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्तींचे योग्य व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे नवी मुंबई महापालिका उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी सांगितले.

यावर्षी कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनानंतर अद्यापही बेलापूर येथील वाहनतळावरच पडून आहेत. गेले कित्येक दिवस विसर्जित श्रीगणेशमूर्ती वाहनतळावरच पडून असल्याने श्रीगणेशभवतांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जित श्रीगणेशमूर्तींची योग्य व्यवस्था करा, अशी मागणी आपण महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. - निलेश कचरे,  सामाजिक कार्यकर्ते - सानपाडा, नवी मुंबई.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कौटुंबिक न्यायालयात बालहक्कांवर प्रकाश टाकणारे ‘थोडा पॉज’ पथनाट्य सादर