‘महावितरण'ने पकडली ४२ लाखाची वीज चोरी
ठाणे : ‘महावितरण'च्या भरारी पथकाने कोलशेत येथील ‘द रेकडी' या हॉटेलवर छापा मारुन तेथे होत असलेली तब्बल ४२ लाखाची वीज चोरी उघडकीस आणली आहे. या हॉटेल चालकाने ‘महावितरण'च्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन रिमोट सर्कटिच्या मदतीने मीटरमध्ये होणाऱ्या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्भभरापासून वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. मीटरच्या डेटामध्ये संशयास्पद अनियमितता दिसून आल्यामुळे संबंधित ग्राहकांचे मीटर तपासण्याचे आदेश मुख्य अभियंता संजय पाटील यांनी दिले होते. ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता माणिक राठोड (प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पोलीस ठाण्यात सदर हॉटेल मालकाविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ नोव्हेंबर २०२५ रोजी महावितरण कोलशेत उपविभागातील सहाय्यक अभियंता वि्ील माने आणि त्यांचे सहकारी फोरमन किरण दंडवते, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बने यांनी खवेरा सर्कल येथील हॉटेल ‘द रेकडी'च्या विद्युत मीटरची तपासणी केली असता मीटरच्या सीलमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. तसेच मीटर मध्ये पल्सची नोंद सुध्दा होत नसल्याने मीटरची सखोल तपासणी केल्यावर अनियमित वीज वापर होत असल्याचे समजले. तेथे उपस्थित ग्राहक प्रतिनिधी यांना दाखवून मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी ग्राहक प्रतिनिधी समोर मीटरची तपासणी केल्यावर मीटरमध्ये वीजवापर कमी दाखवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिमोट सर्किट लावल्याचे निदर्शनास आले. सदर रिमोट सर्कटि वीजचोरी करण्यासाठी लावल्याचे ग्राहक प्रतिनिधी यांनी कबूल केली. मीटरची तपासणी केली असता मीटरमधून गेल्या २४ महिन्यापासून १,१०,३९३ युनिटची एकूण ४१ लाख ६६ हजार ७१० वीजचोरी केली असल्यामुळे वीज ग्राहक शिवराम शेट्टी आणि वीज वापरकर्ता शैलेश डेढिया यांच्यावर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ आणि कलम १३८ अन्वये कोपरी पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरी एक फौजदारी गुन्हा असुन ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा. अनधिकृत वीज वापरल्यास याचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. ‘महावितरण'ची विजचोरांविरुध्द मोहीम सुरुच राहणार आहे. यापुढे अशी वीजचोरी आढळ्यास वीज चोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-संजय पाटील, मुख्य अभियंता-भांडुप परिमंडल, महावितरण.