तळोजा परिसरातील अंमली पदार्थ रॅकेटचा भंडाफोड
1.17 कोटींचा हेरॉईन व अफीम जप्त
नवी मुंबई : नवी मुंबईला नशामुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या सूचनांनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी सकाळी तळोजा परिसरातील एका फ्लॅटवर छापा मारुन अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नवज्योतसिंग उर्फ विकी रंधावा (34) आणि गुरज्योतसिंग उर्फ सनी रंधावा (32) या दोन भावांना अटक करुन त्यांच्या जवळ सापडलेले तब्बल 1 कोटी 17 लाख 19 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन आणि अफीम जप्त केले आहे. पोलिसांनी आता या रॅकेटमध्ये सहभागी असलेले पुरवठादार व सब डीलर अशा पाच जणांचा शोध सुरु केला आहे.
तळोजा परिसरामध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट सुरु असल्याचे तसेच दोन व्यक्ती सदर अलमी पदार्थाचा पुरवठा करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुजांळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता तळोजा फेज-2 मधील हेरिटेज कॅसल या बिल्डिंगमधील नवज्योतसिंग आणि गुरज्योतसिंग हे दोघे भाऊ राहत असलेल्या फ्लॅटवर छापा टाकला.
या छाप्यात 158 ग्रॅम हेरॉईन (किंमत 1,16,19,000) आणि 40 ग्रॅम अफीम (किंमत 1,00,500) असा मोठा आढळुन आला. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने 1 कोटी 17 लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थाचा साठा जफ्त केला. अधिक चौकशीत नवज्योतसिंग आणि गुरज्योतसिंग हे दोघेही पंजाब येथून ट्रक ड्रायव्हर मार्फत अमली पदार्थ नवी मुंबईत मागवून ते तळोजा व कळंबोलीतील चार सब डीलर मार्फत ग्राहकांना विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघा 21(बी), 21(सी) व 29 अंतर्गत गुन्हे दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, पंजाब येथून नवी मुंबईत अमली पदार्थ आणुन देणारा मुख्य पुरवठादार तसेच नवज्योतसिंग आणि गुरज्योतसिंग या दोघां मार्फत ग्राहकांना अमली पदार्थाची विक्री करणारे चार सब डिलर या पाच जणांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त संजयकुमार येनपुरे, अफ्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुजांळ, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, पोलीस हवालदार रमेश तायडे, पदु दोरे, गणेश पवार, चालक परमेश्वर भाबड, पोलीस शिपाई पाटील आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पगारे यांच्या पथकाने केली.