वालधुनी नदी वाचवण्यासाठी जलसमाधीचा प्रयत्न
अंबरनाथ : वालधुनी नदीचे प्रदुषण आणि तिचे पुनरुज्जीवन या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुकारलेले ‘वालधुनी नदी बचाओ जल समाधी आंदोलन' १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे शांततामय मार्गाने झाले. आंदोलकांनी नदीपात्रात जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी आचारसंहिताचे कारण देत त्यांना रोखले.
वालधुनी नदी आणि तिच्या उपनद्या वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या लढ्याला अधिक धार देण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी ‘जलसमाधी आंदोलन'ची हाक दिली होती. आंदोलनाच्या निश्चित स्थळी, म्हणजेच वालधुनी नदी बंधारा, फंसी पाडा, कमलधाम वृध्दाश्रम, अंबरनाथ येथे आले होते.
आंदोलक नदीच्या पात्राजवळ जमा झाले आणि त्यांनी जल समाधी घेण्याचा प्रयत्न सुरु केला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस पथक आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना सध्या आचारसंहिता लागू असल्याने आंदोलन न करण्याची विनंती केली. यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात चर्चा झाली.
सामाजिक कार्यकर्ते निखिल गोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आंदोलकांनी आपले कठोर पाऊल मागे घेतले. कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता, आंदोलकांनी नदीच्या पात्राजवळच शांततामय मार्गाने आपले आंदोलन केले आणि वालधुनी नदी वाचवण्याचा निर्धार व्यक्त केला.