केडीएमसी निवडणूकः आरक्षण सोडतीचा अनेक माजी नगरसेवकांना फटका

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागांचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली. या सोडतीत ‘केडीएमसी'तील अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना आरक्षणाचा फटका पडला असून आता त्यांच्यावर प्रभागातून अन्य प्रभागातून निवडणूक लढण्याची नामुष्की ओढवणार आहे.

केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ निवडणुकीसाठी १२२ सदस्य निवडीसाठी प्रथमच बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेतली जाणार आहे. ‘केडीएमसी'च्या १२२ प्रभागांसाठी ४ सदस्यांचा एक पॅनल पध्दतीने निवडणूक घेण्यासाठी ४ सदस्यांचे २९ प्रभाग आणि ३ सदस्यांचे २ प्रभाग असे ३१ प्रभाग जाहीर करण्यात आले होते. या ३१ प्रभागातील १२२ जागा साठी एससी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारण वर्गासह त्यातील महिला वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागांकरिता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत ‘केडीएमसी'तील अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांना धक्का बसला आहे.

डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्र.२६ मधील ४ जागांसाठी जाहीर झालेल्या सोडतीत २ जागा सर्वसाधारण महिला गटासाठी तर प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या प्रभागातील मागच्या निवडणुकीत निवडून आलेले ‘भाजपा'चे संदीप पुराणिक, मुकूंद पेडणेकर, विश्वदीप पवार आणि मंदार हळबे या चारही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. या ४ जागांसाठी काढलेल्या आरक्षणात २ जागा सर्व साधारण महिला राखीव असल्याने सदर चौघांपैकी दोघांना आपल्याच घरातील महिला सदस्यांना निवडणूक रिंगणात उभे करावे लागणार आहे. तर उर्वरित २ जागांपैकी  एक जागा सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित असल्याने यातील एकाचे पूर्वसन होईल उरलेली एक जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने ४ माजी नगरासेवकांपैकी तिघांना आरक्षणाचा फटका बसला आहे.

अशीच परिस्थिती कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक-६ मध्ये पडलेल्या आरक्षणामुळे निर्माण झाली आहे. मागच्या निवडणुकीत ‘मनसे'च्या कस्तुरी देसाई आणि तृप्ती भोईर तर ‘शिवसेना शिंदे गट'च्या नीलिमा पाटील आणि वैजयंती गुजर घोलप या ४ महिला माजी नगरसेविका निवडून आल्या होत्या. या प्रभागातील ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण महिला तर प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने ४ पैकी दोघा माजी नगरसेविकांना सर्वसाधारण महिला वर्गातून संधी मिळेल, तर एक माजी नगरसेविका सर्वसाधारण वर्गातून निवडणुकीला उभ्या राहू  शकते. तर एका माजी नगरसेविकेला या आरक्षणचा फटका पडणार आहे.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र.५ मधून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांनी त्यांच्या मुलासाठी तयारी सुरु केली होती. मात्र, त्यांच्या या प्रभागातील चारही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला आणि सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता दुसरा प्रभागातून निवडणुकीला उभे राहण्यासाठी अंडरस्टँडिंग करावी लागणार आहे.

‘भाजपा'चे माजी नगरसेवक आणि माजी शहरप्रमुख वरुण पाटील मागच्या वेळी निवडून आलेल्या आधारवाडी प्रभागाची फोड करुन नव्याने निर्माण करण्यात आलेल्या काही प्रभागांना जोडला असून मोठ्या प्रमाणात या प्रभागाचा भाग प्रभाग क्र.१ मध्ये समाविष्ठ केल्याने या आरक्षणाचा त्यांना फटका बसला आहे. कल्याण मधील ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांचा जुना प्रभाग साई चौक इतर ३ प्रभागात विखुरल्याने त्यांना देखील नवीन प्रभाग पहावा लागणार आहे.

डोंबिवली मध्ये ‘भाजपा'त पक्ष प्रवेश केलेले ‘काँग्रेस'चे माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर आणि नंदू म्हात्रे यांच्या जुन्या प्रभागाचा भाग विभागला गेल्याने आता त्यांनी प्रभाग क्र.२५ मधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, याठिकाणी आधीच ‘भाजपा'चे २ सीटिंग माजी नगरसेवक निवडू आलेले असताना त्याचा पत्ता कट करुन भाजपा पक्ष प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली जाते की ‘भाजपा'च्या सिटिंग माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार? त्यामुळे या प्रभागात नक्की कोणाला फटका बसणार? ते सुध्दा पहावे लागणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा