एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा पाणीबाणी
कल्याण : एमआयडीसी निवासी आणि आजुबाजुच्या ग्रामीण परिसरातील पाणी प्रश्नाविषयी मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाल्यावर आणि एका दिव्यांग वयोवृध्द व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर स्थानिक आमदार, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्व नागरिकांनी ७ नोव्हेंबर रोजी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून पाणी पुरवठा जास्त दाबाने येण्यास सुरवात झाली होती. यानिमित्त सर्वांनाच हायसे वाटून सदर प्रश्न सुटल्याने आनंद झाला होता. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण, आता गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पाण्याचा दाब कमी झाला असून तेही पाणी ठराविक वेळेत येत असल्याने पाण्याचा प्रचंड तुडवडा भासत असल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला असून पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे पाणी येत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा जाब उमेदवार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना जरुर विचारुन मतदान कोणाला करायचे की नोटाला करायचे? ते आम्ही ठरविणार असे काही नागरिक आता नैराश्येतून बोलू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या ऐन निवडणुकीत पाणी प्रश्न पेटणार असल्याचे दिसत आहे.
एमआयडीसी निवासी मधील काही रहिवाशी सोसायटी, बंगले आणि ग्रामीण परिसरात पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने एमआयडीसी निवासी-सुदामानगर मधील नवसंकुल सोसायटी मधील रहिवाशांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी सुदेश बेर्डे यांनी उदिग्न होऊन चीड व्यक्त केली असून जर आम्हाला अत्यावशक गरज असलेले पाणी धरणात भरपूर पाणी असूनही आणि चांगला पाऊस पडला असतानाही का प्रशासन देऊ शकत नाही? याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी केली आहे.
मिलापनगर मधील बंगल्यात राहणारे राजीव देशपांडे यांनीही संताप व्यक्त करुन एमआयडीसी आणि राजकारण्यांना यासाठी दोष दिला आहे. निवासी भागात पाण्याबरोबर गटार, नाले, स्वच्छता, भूमीगत सांडपाणी वाहिन्या, धोकदायक इमारती, रिडेव्हलपमेंट, वीज पुरवठा, आदि प्रश्न, तक्रारी आहेत. त्यांचाही निपटारा लवकरच झाला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.