बुलेट ट्रेन विरोधात भरोडी ग्रामस्थ एकवटले
भिवंडीः भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प भिवंडी तालुक्यातून जात आहे. तर ‘बुलेट ट्रेन'चे कारशेड तालुक्यातील अंजूर या परिसरात होत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्याविरोधात स्थानिकांचा जनक्षोभ वाढत आहे. स्थानिक भरोडी ग्रामस्थांनी या विरोधात१६ नोव्हेंबर रोजी आंदोलन छेडले असून भरोडी येथील ‘बुलेट ट्रेन'च्या काम बंद आंदोलनासाठी स्थानिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनात ग्रामस्थ स्त्री-पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये भरोडी येथील असंख्य शेतकरी बाधित झाले आहेत. येथील कारशेड मुळे भरोडी येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यासाठी ६ किलोमीटरचा वळसा घालून जावा लागणार आहे. तर येथील विद्यार्थ्यांना अंजूर येथील शाळेत जाण्यासाठी रस्ता राहिला नसल्याने त्यांनासुध्दा ६ किलोमीटरचा वळसा घालून खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन धोकादायक प्रवास करावा लागणार आहे. येथील शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी भुयारी मार्ग उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच विलास पाटील, उपसरपंच संगीता पाटील, मनसे तालुका उपाध्यक्ष आकाश दिनकर, ग्रामस्थ विजय भोईर, दिनेश पाटील, प्यारेलाल पाटील, लालचंद्र पाटील, रविना पाटील, सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरु केले आहे. ६ महिन्यापूर्वी याच मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. परंतु, प्रशासनाने दुर्लक्ष करीत ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
भरोडी गावातील बरीच शेती खाडीलगत असून तेथे कारशेडची भिंत उभी केल्यास शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यास ६ किलोमीटरचा फेरा पडणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त असून त्यातच प्रकल्पाचे काम सुरु असून भविष्यात यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, विद्यार्थी यांच्या त्रासात भर पडणार आहे. प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष न दिल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करुन साखळी उपोषण सुरु ठेवणार असल्याचा निर्धार मनसे उपाध्यक्ष आकाश दिनकर यांनी व्यक्त केला आहे. भरोडी गावाला जोडणारा मुख्य रस्ता ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता खोदून कच्चा मातीचा रस्ता तयार करुन दिला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल झाल्याने त्या रस्त्यावरील प्रवास जीव घेणा झाला होता. त्यासाठी बुलेट ट्रेन प्रशासनाने मुख्य रस्ता पुन्हा बनवून द्यावा, अशी मागणी सरपंच विलास पाटील यांनी केली आहे.
भरोडी गावातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी अंजूर गावातील माध्यमिक शाळेत पायी १० मिनिटात जात असतात. परंतु, सदर रस्ता कारशेडच्या भिंतीमुळे बंद होण्याने विद्यार्थ्यांना सुध्दा मोठा वळसा घालून शाळेत जावे लागणार आहे. रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ यामुळे अपघात घडू शकतात, अशी भिती मैथिली पाटील या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे. या साखळी उपोषण आंदोलनात ग्रामस्थ दररोज सहभागी होऊन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सरपंच विलास पाटील यांनी सांगितले.