नेरुळ येथील शिवसृष्टीचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

नवी मुंबई : नेरुळ, सेवटर-१ आणि ३ मधील चौकात असलेली शिवसृष्टी अनेक महिन्यांपासून तयार आहे. पण, महाराजांचा पुतळा धुळीने माखलेल्या कपड्याने बंदिस्त होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीची एक प्रकारे विटंबना होती. त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी शिवसृष्टी सर्वसामान्यांसाठी खुली केली. यावेळी पोलिसांनी शिवप्रेमींना अडविण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांचा विरोध झिडकारुन अमित ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी शिवसृष्टी खुली केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी अशा कार्यासाठी माझ्यावर पहिलाच गुन्हा नोंदवला जात असेल, तर मला त्याचा आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  मी छत्रपती शिवरायांसाठी स्वतःवर एक काय शेकडो गुन्हे घ्यायला तयार आहे, अमित ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमित ठाकरे यांच्यासह ४० मनसैनिकांवर गुन्हा दाखल

दरम्यान, नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह सुमारे ४० मनसैनिकांवर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच महापालिकेच्या जाळ्यांचे नुकसान केल्याच्या आरोपांवरून सदर कारवाई करण्यात आली.

नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला शिवस्मारकाचा पुतळा अनेक महिन्यांपासून अनावरणासाठी प्रतिक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी रितसर परवानगी न घेता या पुतळ्याचे लोकार्पण केले. या अनधिकृत कृतीदरम्यान मोठा जमाव जमवून मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, मनसैनिकांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच दिलेल्या सूचना पाळण्यास नकार देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आला. शिवाय नवी मुंबई महापालिकेकडून पुतळ्याभोवती लावण्यात आलेल्या जाळ्यांचे खोडसाळपणे नुकसान केले गेले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन नेरुळ पोलिसांनी मनसे नेते अमित ठाकरे, प्रववते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहरप्रमुख सविनय म्हात्रे, अभिजीत सावंत, शहर सचिव सचिन कदम, अक्षय भोसले, निखील गावडे, उमेश गायकवाड, सागर विचारे, श्रीकांत माने, विलास घोणे, योगेश शेटे, मयूर कारंडे, मंगेश जाधव, आरती नायडू, विलास गाडगे, सुरेश शेटे, अमोल आयवळे, सनप्रित तुर्मेकर, निखील खानविलकर, अक्षय कदम, अभिलेश दंडवते, श्याम डमाळे, प्रतिक खेडकर, शशी गजंगे, संतोष गायकवाड, संदेश खांबे, प्रविण शिंदे, अनिकेत भोपी या पदाधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर मोर्चा काढणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे, सरकारी सूचनांची अवहेलना आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेरूळ पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळाचा पंचनामा यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनावश्यक तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पुतळा अनावरण बाबत महापालिकेचे स्पष्टीकरण...

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरुळ, सेक्टर-१, नेरुळ येथे राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले नाही.

वास्तविकतः सदर पुतळ्याच्या भोवतालची स्थापत्य कामे अद्याप पूर्ण झालेली नसून ती अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे सदर पुतळ्याची समारंभपूर्वक रितसर प्रतिष्ठापना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जाहीर करुन लवकरच करण्यात येईल. अशाप्रकारे संबंधित प्राधिकरणाची परवानगी न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळ्याचे अनावरण करणे, अशी बाब कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चुकीची असून अनधिकृत आहे, असे महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा पाणीबाणी