‘नमुंमपा'च्या टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्राची प्रशंसा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत ‘वस्त्र समिती'च्या माध्यमातून टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प देशात प्रथमतः सीबीडी-बेलापूर येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची केंद्रिय वस्त्र मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी पाहणी करीत चांगले काम सुरु असल्याबद्दल प्रशंसा केली.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत ‘केंद्र सरकार'च्या वस्त्र आयुक्त डॉ. एम. बीना, ‘वस्त्र मंत्रालय'चे संचालक अशोक जयस्वाल, ‘वस्त्र समिती'चे सचिव कार्तिकेय धांडा उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त स्मिता काळे तसेच ‘वस्त्र समिती'चे संचालक डॉ. तपन रौत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेने टाकाऊ वस्त्रावर पुर्नप्रक्रिया करणारा अभिनव प्रकल्प प्रायोगिकरित्या सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला असून तो यशस्वीपणे राबवित असल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करीत केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी देशातील इतरही शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरु केले जावेत, असे मत व्यक्त केले. तसेच याबाबतची कार्यशाळा नवी मुंबईत आयोजित केली जावी, असे सूचित केले.

याप्रसंगी प्रकल्पस्थळी येणाऱ्या कापडी कचऱ्यााच्या ६ प्रकारे वर्गीकरणाच्या पध्दती त्यांनी जाणून घेतल्या. तसेच कपडा कोणत्या प्रकारचा आहे? याची यांत्रिक चाचणी कशा रितीने होते, याचीही पाहणी केली. नागरिकांकडून टाकून देण्यात आलेले कपडे आणि कापड प्रकल्पस्थळी प्रक्रिया करुन आकर्षक स्वरुपात पुननिर्मित केले जात असल्याचे पाहून त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे त्याठिकाणी काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधतांना त्यांना या कामापासून रोजगार उपलब्ध होतोच; शिवाय आपण काहीतरी नाविन्यपूर्ण निर्मिती करतो याचा आनंद देखील या महिलांना मिळतो, याबद्दल राव यांनी समाधान व्यक्त केले.

सद्यस्थितीत मोठया सोसायट्या, मॉल, कार्यालये अशा वर्दळीच्या ठिकाणी टाकाऊ वस्त्र संकलनासाठी ‘नमुंमपा'च्या पुढाकाराने एसबीआय फाऊंडेशन लि. यांच्या मदतीने आणि टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत मोठ्या पेट्या ठेवण्यात आल्या असून टाकाऊ वस्त्राचे संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी असलेले थ्री आर सेंटर्स आणि या पेट्यांमधून टाकाऊ कपडे संकलीत करण्यात येत असून ते बेलापूर, सेवटर-२ मधील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत येथे सुरु असलेल्या टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्रस्थळी आणण्यात येत आहे.  

या कार्यवाहीत टाकाऊ कपडे देण्यासाठी उत्तम योगदान देणाऱ्या सीवुडस्‌ इस्टेट फेज-१ बेलापूर, ओम्‌ सिध्दी टॉवर सोसा. सेक्टर-२७ नेरुळ आणि नेक्सस सीवुडस्‌ मॉल या तीन संस्थांचा यावेळी सचिव नीलम राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रकल्प ठिकाणी ‘टिसर आर्टिसन ट्रस्ट'च्या मदतीने चांगल्या स्वरुपातील टाकाऊ वस्त्रांचे विलगीकरण करुन हॅन्डलूमच्या सहाय्याने अप-सायकलींग करण्यात येते. याद्वारे टाकाऊ कपड्यापासून विविध प्रकारच्या वस्तुंची पुनर्निमिती करण्यात येत असून तयार करण्यात आलेल्या वस्तुंंच्या विक्रीला बाजारात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर प्रकल्प राबविल्याने महापालिका क्षेत्रातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाणाऱ्या कचऱ्याचा भार काही अंशाने कमी होत असून कचरा कमी करण्याप्रमाणेच महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.

वापरुन झाल्यानंतरच्या कपडे आणि कपड्याचे व्यवस्थापन करण्याचा सदर अभिनव प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची देशातून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुपर स्वच्छ सिटी म्हणून नावजल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील सदर प्रकल्प इतर शहरांसाठीही अनुकरणीय आहे.
-नीलम राव, सचिव-केंद्रिय वस्त्र मंत्रालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वालधुनी नदी वाचवण्यासाठी जलसमाधीचा प्रयत्न