दुसऱ्याच्या मरणावर टपलेली गिधाडे
नवा सजीव जन्माला घालणे आपल्या हातात नाही. असे असताना एखाद्याच्या मरणावर टपणे योग्य आहे का, याचा प्रत्येकाने तारतम्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी आयुष्य दीडशे वर्षापर्यंत वाढवण्यासाठीचे संशोधन पाश्चिमात्य देशात सुरू आहे. त्याला जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा येईल, पण मानवाला अद्यापही मृत्यूवर मात करता आलेली नाही. असे असताना जिवंत माणसाला मारून टाकण्याचे काम समाज माध्यमांत दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही खरे तर विकृती असते.
जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. असे असताना जेव्हा माणूस दुसऱ्याचा मरणावर टपतो तेव्हा काही तरी गडबड आहे, ही बाब आपल्याला नाकारता येत नाही. प्रसिध्द हिंदी अभिनेते धमेंद्र हे आजारी होते. वय झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर समाज माध्यमांत त्यांच्याविषयी आलेला प्रतिकूल मजकूर वाचताना ‘माणूस दुसऱ्याच्या मरणावर का टपला आहेे' असा प्रश्न आपोआप उपस्थित होतो.
स्थिती, गती आणि लय ही सजीवाच्या जगण्याचा मूलाधार आहे. यातील एखादी कडी जरी तुटली तर मोठा अनर्थ घडतो. बालपण, शैशव आणि वार्धवय या तीन टप्प्यातून सजीव जात असतो. बालपणी त्याला बरीच उत्सुकता असते. शैशवात तो पराक्रमी, काही तरी वेगळे करण्याचा विचार करतो. वार्धवयात जगलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करत करत अधिक प्रगल्भ जाणीवेने तो जगाकडे पाहत असतो. त्यामुळे जो सजीव जन्माला येतो तो आज ना उद्या या ना त्या प्रकारे इहलोकीची यात्रा संपवणार असतोच. प्रत्येकाची एक वेळ असते, ती भरल्यावर माणूस असो किंवा अन्य प्राणी-पक्षी जगाचा निरोप घेतात हे वैश्वीक सत्य आहे, ते मानवाने विविध क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतल्यानंतरही बदलता आलेले नाही. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याबाबत समाज माध्यमातील मंडळी क्रूर वागली तरी त्याने फारसा फरक पडत नाही. मात्र एक विकृत चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे.
समाज माध्यमे ही खरे तर जग अधिक जवळ आले आहे याचे द्योतक आहे. पण गेल्या काही वर्षापासून या माध्यमांचा विकृत पध्दतीने वापर सुरू आहे, तो वेदनादायी आहे. एखाद्या व्यवतीचे मत पटले नाही तर त्याला ट्रोल करणे समजू शकते (पण तेही चुकीचे आहे.) मात्र वृध्द झालेल्या मान्यवर व्यवतींबाबत श्रध्दांजली वाहण्याचा नवा ट्रेण्ड आलाय तो घातक आहे. या विकृत ट्रेण्डमुळे आजारी असणाऱ्या व्यवतींच्या कुटुंबावर काय बेतत असेल याचा आपण सारासार विचारच करत नाही. अशांना दुसऱ्याच्या मरणावर टपलेले गिधाडे म्हणणेच योग्य आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे असे आपण बोलतो. पण या माध्यमांचा दुरूपयोग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तो रोखायचा कसा हाही गंभीर प्रश्न आहे. नवा सजीव जन्माला घालणे आपल्या हातात नाही. असे असताना एखाद्याच्या मरणावर टपणे योग्य आहे का, याचा प्रत्येकाने तारतम्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी आयुष्य दीडशे वर्षापर्यंत वाढवण्यासाठीचे संशोधन पाश्चिमात्य देशात सुरू आहे. त्याला जेव्हा केव्हा यश येईल तेव्हा येईल, पण मानवाला अद्यापही मृत्यूवर मात करता आलेली नाही. असे असताना जिवंत माणसाला मारून टाकण्याचे काम समाज माध्यमांत दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही खरे तर विकृती असते. आपणही त्या विकृतीच्या मोहजालात अलगद अडकतो. पण असे संदेश समाज माध्यमांमध्ये आल्यावर खातरजमा केल्याशिवाय दुसऱ्याला पाठवणे चूक आहे. मृत्यूबाबत विविध भाष्ये आपल्याकडे करण्यात आलेली आहेत. सजीवाचे शरीर हे मातीतच मिसळले जाते. त्यामुळे माणूस मेल्यावर त्याला मूठमाती देऊन आलो असा शब्दप्रयोग आपल्याकडे सर्वश्रृत आहे. जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या गॅपमधला सजीवाचा प्रवास थवक करणारा असतो. बालपणीचा काळ वार्धवयात अनुभवता येत नाही. बालपणी वार्धवय येत नाही. विशिष्ठ काळ गेल्यावर त्या त्या पायऱ्या येतात, त्यानुसारच शरीर माणसाला साथ देत असते. मृत्यू कधी, कुठे गाठेल हे कोणाला माहिती नसते. असे असताना जिवंत माणसाला मारण्यात कोणती मर्दुमकी आहे? याचा आज ना उद्या आपल्याला सारासार विचार करावाच लागणार आहे. - विवेक कृष्णा कांबळे