वाचलेल्या ग्रंथांच्या पानांइतके रोख बक्षीस देणारा अभिनव उपक्रम
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या ग्रंथाच्या पानाइतवया रकमेचे रोख पारितोषिक त्यांना दिले जाईल ही घोषणा प्रायोगित तत्वावर केल्यानंतर तिला अनुकुल प्रतिसाद मिळाला. विद्यालयाच्या ग्रंथालयात मुला-मुलींंची गर्दी वाढली. वाचनासाठी पुस्तके नेणाऱ्यांची संख्या वाढली. शिक्षक मंडळीच या रोख बक्षीसाचे प्रायोजक म्हणून पुढे आली. ...आणि विेजेती मुले म्हणू लागली की या मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून आम्ही पिझ्झा, बर्गर घेणार नाही, तर पुस्तकेच खरेदी करणार आहोत! एका शिक्षकाला, मुख्याध्यापकाला याहुन आणखी काय बरे हवे असते?
मी खरंच स्वतःला रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय-कोपरखैरणे येथे, मुख्याध्यापक, शिक्षक म्हणून काम, करत असता भाग्यवान समजतोय...कर्तव्य करत असताना, काही प्रयोग आणि रचनात्मक काम करत असता, सर्व शिक्षकांच्या सहविचार आणि मतांच्या आदान प्रदान यातून काही आशादायी गोष्टी घडून येत असतात, हा स्वानुभव आहे. त्या कृतीशील उपक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद घेता येतो, हा माझा अनुभव आहे.
वाचन संस्कृती वाढावी यासाठी, काय करावे हा विचार करत होतोच, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा, त्यात योगायोगाने ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस साजरा होत असताना, एक आठवले आणि ९ वी /अ आणि १०वी /ब या दोन वर्गात सहज म्हणून मी घोषणा केली की, आपणास कृतीयुक्त, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय वर्गातील प्रथम प्रवेश साजरा करायचा आहे, तुमच्या वर्गातून जे विद्यार्थी आजपासून तीन महिन्यात जो कोणता मराठी, हिंदी, इंग्रजी ग्रंथ वाचतील,त्या ग्रंथात जितकी पाने असतील तितकी रक्कम त्यांना बक्षीस दिली जाणार, मात्र आपण जो कोणता ग्रंथ वाचणार, त्या बाबत साधकबाधक प्रश्न शिक्षकाकडून विचारले जातील, पुस्तकावर चर्चा करून, आपणास बक्षीस दिले जाईल. मी ही घोषणा केली ती ७ नोव्हेंबर रोजी आणि तीन चार दिवसात म्हणजे १३ तारखेस दोन विद्यार्थी माझ्याकडे आले आणि आम्ही लोक शाहीर श्री.अण्णाभाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी वाचली असून,कादंबरीमधील आशय, विषय, मुख्य पात्र, कादंबरी का आवडली तसेच यातून मला काय शिकायला मिळाले यावर त्या साईराज जाधव आणि श्रेयस सुतार या ९ वी मधील दोन मुलांनी मला सुखद धक्का दिला.
मलादेखील आनंद झाला आणि त्या दोन्ही मुलांना सकाळी प्रार्थना झाल्यावर सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या समीर..फकिरा या कादंबरीच्या १५२ पानाइतकी रक्कम त्यांना मराठी विषय शिक्षक श्री. उल्हास मेहतर आणि सौ.पल्लवी जाधव यांच्या हस्ते सर्व मुलांसमोर प्रोत्साहन म्हणून दिली. तत्पूर्वी सर्व मुलांसमोर त्यांनी त्या फकिरा या ग्रंथाबाबत, थोडक्यात भाषण, मनोगतदेखील व्यक्त केले.
आनंद हा असतो की, तो आनंद स्वानंद झाल्याने द्विगुणित व्हावा म्हणून मी प्रार्थना आणि सदर मुलांना बक्षीस वितरण झाल्यावर घोषणा केली की, "वाचन संस्कृती वाढावी म्हणून हा उपक्रम आजपासून, इयत्ता ५ वी १२ वीसाठी म्हणजेच एकूण २३८० मुलांसाठी. आपण खुला करत आहोत, जे कोणी, कोणताही ग्रंथ वाचतील, त्यांना त्या ग्रंथाच्या पानांच्या संख्याएवढे पैसे अदा केले जातील, मात्र पानांची संख्या १०० पेक्षा जास्त असावी!” मी ही घोषणा करताच श्री. उल्हास मेहतर या मराठी विषयातील धडपड, तळमळ आणि कळकळ असणाऱ्या आमच्या वरिष्ठ शिक्षक यांनी घोषणा केली की, "सर यापुढे जी कोणी मुले असा ग्रंथ वाचतील, त्या सर्व मुलांना माझ्याकडून व्यक्तिगत ही रक्कम बक्षीस म्हणून, माझ्याकडून असेल!” मला इतका आनंद झाला की काय सांगू, एखादा उपक्रम राबवावा, त्यात शिक्षक यांचा सहभाग असेल तरच खरा आनंद असतो, हा आनंद उरात घेत माझ्या ऑफिसमधून सीसीटीव्ही मधून ग्रंथालयावर मी कॅमेरा झूम केला तर सहज ग्रंथालयाकडे बघितले तर ग्रंथालयात पुस्तकांची देवाण-घेवाण वाढत असल्याचे लक्षात आले. ग्रंथपाल श्री. प्रभाकर पाटील हे मुलांना प्रेमाने ग्रंथ दाखवण्यात व्यग्र असल्याचे दिसले. ग्रंथालयातील वर्दळ वाढत आहे, हे जाणवले. संध्याकाळी सहज व्हॉट्स ॲपवर माझ्या सहकारी सौ.पल्लवी जाधव मॅडम आणि काही कनिष्ठ महाविद्यालय विभागातील तीन मुलींचा इंग्रजी ग्रंथ ग्रंथालयातून घेतला असल्याचे, त्या ग्रंथासोबतचा फोटो मला पाठवला. किती आपण छान आहोत की नाही माहित नाही; पण गांधी, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू हेदेखील,त्यांनी आयुष्यात एक ठराविक ग्रंथ वाचला आणि ते घडले, ते पुस्तकांमुळे घडले, न जाणे उद्या याच मुलात कोणी पुन्हा गांधी जन्मास येईल!
हा वाचन उपक्रम पुढे नेत मी संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीपजी नाईक यांच्या शुभेच्छा घेऊन, हा वाचन संस्कृती वाढवणारा उपक्रम शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत नेऊन, त्यांनादेखील त्यांनी जर एखादा ग्रंथ वाचल्यास नक्कीच त्यांनाही बक्षीस देण्याचा विचार करतोय. आनंदाचे झरे पाझरत असतात, जीवन गंधीत, सुगंधित करत असतात; मात्र आपण आपले उद्दिष्ट आणि स्वप्नातील प्रकल्पं यांना प्रयत्न करत, जोड दिल्यास छान आशादायी चित्रं निर्माण होऊ शकते. सुदैवानं माझ्या संस्थेत आम्हा सर्व शिक्षक यांना विद्यार्थी केंद्रित, गुणवत्ता वर्धक कामासाठी परिपूर्ण खेळापासून ते वर्गांतील रचनात्मक कामासाठी मुभा असते, त्यातून भरारी घेणारी पाखरे, फुलपाखरे हे गरुड होत, गारूड घालत आहेत. खरं सांगू का, जेव्हा संस्थेचे विश्वस्त, मा.खासदार श्री.संजीवजी नाईक यांच्या धर्मपत्नी सौ. कल्पनाताई नाईक मॅडम ह्या स्वतः दर शनिवारी शाळेत येऊन मुलांना जीवन विद्या माध्यमातून सदगुरू श्री वामनराव पै यांचा विचार प्रसाद देत असतात, वर्गात जाऊन स्वतः तासिका घेतात, सोबत ग्रंथ घेत, कुठल्या पुस्तकात, ग्रंथात काय ते वाचून दाखवतात, वाचन संस्कृती वाढावी म्हणून एक स्वतः कृतीयुक्त उदाहरण आम्हा समोर ठेवतात, विद्यार्थ्यांना ४० मिनिटे शिकवतात, त्यातच आम्हा सर्व शिक्षक यांनादेखील उर्मी, ऊर्जा प्राप्त होत जाते.
मी सहज दुसऱ्या दिवशी साईराज जाधव आणि श्रेयस सुतार या बक्षीस पात्र मुलांना म्हटले, तुम्हाला जे १५२ रुपयांचे बक्षीस मिळाले, त्याचे काय करणार? पिझ्झा, बर्गर की फ्रँकी खाणार? ते सहज म्हणाले, "सर त्यातून आम्ही एक नवीन ग्रंथ, पुस्तक विकत घेणार!”
चला, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अनोखा उपक्रमावरच समाधान न मानता...नवीन उपक्रमासाठी काही तरी विचार करू या.
- प्रा.रवींद्र पाटील (मुख्याध्यापक) रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपरखैरणे