विधीलिखीत हा विश्वास की भास?
अनेकजण म्हणतात सर्व काही आधीपासूनच ठरलेले असते. जर तसे असेल तर आपण ते मिळवण्यासाठी का धडपडत असतो? आपल्या मेहनतीला व कष्टाला काय अर्थ उरतो? जीवनात आपली जबाबदारी आणि कर्म कुठे समाप्त होतात आणि भगवान आणि ईश्वराची भूमिका कुठे सुरु होते? जर भगवान सर्व काही नियंत्रित करत असेल, तर मनुष्याला दोष का दिला जातो? किंवा हा केवळ आपल्या नैतिक समजुतीचा प्रश्न आहे? जर भगवान इतके सर्व शक्तीमान आहेत, तर मग आपल्याला भगवंताला वाचविण्यासाठी तलवार उचलण्याची गरज का वाटते?
आपला भारत देश जसा कृषिप्रधान आहे तसाच तो देवप्रधानही आहे. जगातील सर्वात जास्त देव आणि देवस्थाने आपल्या देशात आहेत. जे आस्तिक आहेत ते देवाला, धर्माला तथाकथित साधुसंताना, प्रवचनकारांना मानतात व तथाकथित प्रवचनकारांचे ऐकतातसुध्दा. पण स्वतःच्या बुद्धीने सारासार विचार करायला कचरतात, त्यांना वाटते आपण देवाच्या किंवा धर्माच्या विरोधात बोललो व सत्य शोधून काढले तर, देव आपल्यावर कोपेल, साधू संत आपल्याला धर्मभ्रष्ट वा नास्तिक ठरवतील, या भीतीपोटी मनात असो नसो, तो पारंपारिक गोष्टी पाळत राहतो.
जर जगात भगवान (देव) असते तर ते तसे नसते. जसे आपल्याला हजारो वर्षापासून सांगण्यात आलेले आहे. कोणी आपल्या गरजेनुसार वा तक्रारानुसार ईश्वराचे रूप सांगत आहे. तर कोणी ईश्वराच्या नावावर आपल्याला भीती दाखवून त्याचे गुलाम बनवित आहे. आपण स्वातंत्र्यासाठी हिंदू-मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, शिख, जैन एक झालो. आपण सर्वांनी मिळून इंग्रजांना व इतर परकीय शासनकर्त्यांना पळवून लावले. पण, आपण परस्परांमध्ये एकत्र होऊ शकलो नाहीत. मतभेद इतके खोलवर गेले की, देशाची फाळणी झाली. पण तरीही तोच द्वेष, तीच भांडणे, तोच खूनखराबा होतो आहे. धर्म विचारून गोळी मारली जाते. याच्यापेक्षा मोठी दुःखाची कोणती गोष्ट असू शकते? देशाला तुकड्यामध्ये विभागूनसुध्दा आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्याची किंमत चुकवू शकलो नाहीत. पण धार्मिक श्रध्देचे काही फायदेसुध्दा आहेत. ते लोकांना परस्परांमध्ये जोडतात. एकमेकांबरोबर उभे राहण्याची प्रेरणा देतात आणि भगवान असतील किंवा नसतील; पण, भगवान असल्याची भीती समाजात एक व्यवस्था, एक शिस्त कायम ठेवते. पण अनेकवेळा तीच भीती इतकी विकृत होते की, ती संपूर्ण मानवतेला घाबरवते. कारण धार्मिक निष्ठा आपल्यासाठी नेहमीच अतिशय संवेदनशील असते. आपण त्यास आपला अभिमान मानतो, पण कधी-कधी तीच श्रध्दा इतकी अंध होते की, आपण धर्माच्या नावावर मरणे आणि मारणे सुरू करतो.
जगात अनेक असे देश आहेत जे देवाला वा धर्माला मानत नाहीत, तरीही ते फार पुढारलेले आहेत. प्रगतीशील आहेत. तेथे शिक्षितांचं प्रमाण १००% आहे. ते आपल्या कृतिशीलतेला नवनवीन प्रयोगशिलतेला देव मानतात. म्हणून ते पूर्ण विकसित देश आहेत. म्हणून ते तेवढेच आनंदीही आहेत. आपल्या देशाच्या तुलनेने त्यांचे देशाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या कमी आहे. संसाधनेही कमी आहेत, तरीही ते सुखासमाधानात जगताना दिसतात. आपल्याकडे काहीही कमी नाही. आपल्या देशाचे क्षेत्रफळ मोठे आहे.
जनसंख्याही तेवढीच मोठी आहे. काम करणारे हातही जास्त आहेत, तरीही आम्ही सुखी व समाधानाने व आनंदाने जगू शकत नाहीत. भूतानसारखा चिमूकला देश ज्यालापसरायला जागाच नाही, सर्व देश डोंगर दऱ्यांनी वेढलेला, मोठ्या उद्योगाला वाव नाही. तरीही तो जगात सर्वसुखी व आनंदी देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर आपण अठराव्या स्थानांवर फेकलो गेलो आहोत. त्याला आपणच कारणीभूत आहेत. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास युक्रेनचे देता येईल. हा देश फारसा मोठा नाही. गेली काही वर्षे तो रशिसारख्या बलाढ्य देशाशी झुंजतो आहे. तरीही तो आपल्यापेक्षा वरचे स्थान बळकावून आहे. जिथे लोकांनी आपल्या कुटूंबाला मालमत्तेला, घरांना गमावले आहे आणि ते शेल्टरमध्ये उपाशी तापाशी राहत आहेत. जो देश आज बॉम्बच्या धूरात हरवलेला आहे. तो देशसुध्दा आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे.
आपल्या समाजात हत्या, हिंसा आणि पाप त्यांच्यापेक्षा जास्त का आहेत ज्यांना आपण अधर्मी किंवा नास्तिक मानतो? आपण इतके धार्मिक असूनही इतके त्रासलेले का आहोत? आपल्यात अशी कोणती कमी आहे जी आपल्याला आनंदी होण्यापासून रोखत आहे. ती कमी म्हणजे आपला अंधभवतीने वेढलेला आपला विचार. कधी कधी आपण धर्माच्या नावावर इतके फसतो की, आपण विसरतो की, मानवताच मोठा धर्म आहे. संस्कृती आहे. आपले तोकडे विचारच आपल्याला मागे खेचतात. त्यात भर घालतात. स्वार्थी, मतलबी तथाकथित धर्माचे रक्षकच धर्माचे भक्षक बनताना दिसतात. त्यांना स्वतःच्या मेहनतीने काही मिळवायचे नसते. ते दुसऱ्यांना फूस लावून त्यांच्यात आपापसात लावून द्यायची व तमाशा बघत बसायचे कधी कधी मोठेपणाचा आव आणत दोघात समझोता करण्याच्या नावाखाली आगीत तेल ओतण्याचे काम करून मोकळे होतात व त्याचा लाभ उठवून मालामाल होताना दिसतात. तर राजकारणी मंडळी धर्माधर्मात जातीपातीचे राजकारण करून आपली सत्तेची भाकरी भाजून घेतात. ते आपण समजून घेतलं पाहिजे.
खरं तर मी आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही. आणि कोणाच्या विरोधातही नाही, पण डोळसपणे विचार करून लोकांना वागायला शिकवणे, अंधश्रद्धेतून मुवत करणे ही कर्तव्याची भूमिका पाळणे माझे कर्तव्य समजतो, ज्यांना ऐकायचे ते ऐकतील ज्यांना ऐकायचे नाही ते आपल्या कर्माने मरतील. इथे लोकांनी धर्माच्या नावावर मरू नये.
त्याऐवजी मानवतेच्या प्रेमात जगणे शिकावे. प्रत्येकाने आपल्या विवेकाने योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घ्यावा म्हणजे कोणी त्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करू शकणार नाही. या गोष्टीने विशेष फरक पडत नाही की, तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आहात; आणि याचाही फरक पडत नाही की, तुम्ही हिंदू आहात किंवा मुस्लिम आहात. पण यामुळे पूर्ण समाजात फरक पडतो की, तुम्ही एक चांगला माणूस आहात की नाही!
सध्या धर्ममार्तडांनी व राजकारण्यांनी धर्माच्या नावावर अधर्म चालवला आहे. स्वतःची टिमकी बडवण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. अंधभवतीचा एवढा पगडा आपल्या मनावर आहे की आपण म्हणतो, सर्व काही भगवंताच्या हातात आहे. पण जेव्हा तोच भगवान कोणाच्या हातून चोरी करवून घेतो, बलात्कार करवून घेतो, भ्रष्टाचार करवून घेतो, कोणाची हत्या करवून घेतो. आपण अपराध्यालाच दोष देत बसतो. या गोष्टीला फवत अपराधीच जबाबदार आहे का?
जीवनात आपली जबाबदारी आणि कर्म कुठे समाप्त होतात आणि भगवान आणि ईश्वराची भूमिका कुठे सुरु होते? जर भगवान सर्व काही नियंत्रित करत असेल, तर मनुष्याला दोष का दिला जातो? किंवा हा केवळ आपल्या नैतिक समजुतीचा प्रश्न आहे? जर भगवान इतके सर्व शवितमान आहेत, तर मग आपल्याला भगवंताला वाचविण्यासाठी तलवार उचलण्याची गरज का वाटते?
इतिहास आणि आजच्या काळातही आपण वाचले पाहिले आहे की, मनुष्य स्वतः शस्त्र उचलतो, युध्द करतो, संघर्ष करतो. केवळ या विश्वासामुळे की, ते ईश्वराचे रक्षण करीत आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की, जर भगवान प्रत्येक बाबतीत सक्षम आहेत, तर आपण हातात तलवार वा शस्त्र घेऊन ईश्वराचे संरक्षण करायला हवे आहे का? आपली श्रध्दा केव्हा योग्य दिशेने असते आणि केव्हा अंधश्रद्धा हिंसेचे रूप घेते. कधी कधी आपला धर्म श्रद्धा, आपले विचार आणि मानवता यांच्या विरोधात काम करू शकते; आणि हिच गुंतागुंत आहे. गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. या बाबतीत माण़साने स्वतः विचार करायला हवा.
जर एखादा लंपट माणूस एखाद्या मुलीवर जबरदस्ती करत असला तर त्या दृष्टाला आपण का रोखावे? आपले धर्मशास्त्री सांगतात की, आपल्याला जे दुःख भोगावे लागते त्यात मागील जन्माच्या पापाचे फळ आहे असे समजावे? मग ज्या बाईवर अत्याचार होऊ घातला आहे त्याला तिच्या मागच्या जन्माचे फलित समजावे का? काही लोक म्हणतात प्रत्येक घटना एखाद्या मोठ्या न्यायाचा भाग असते. पण, जेव्हा आपल्या समोर कोणता अन्याय होत असेल, तेव्हा आपण गप्प बसून बघत राहावे की, ईश्वराची हीच ईच्छा आहे! मग नैतिकता आणि श्रध्दा याचा खरा अर्थ काय आहे? आपली संवेदना, आपली जबाबदारी आपल्याला गप्प राहू देत नाही. कारण जर आपण केवळ ईश्वराच्या न्यायावरच विश्वास ठेवला, तर निर्दोष मनुष्याची हत्या किंवा त्याची वेदना कोण थांबवेल? मानवाने केवळ सत्य आणि मानवता याच्यासाठी उभे राहावे. त्याने फवत अंधश्रद्धेच्या आधारावर स्वतःला बाजूला ठेऊ नये. स्वतःला कृतिशील केलेच पाहिजे.
अनेकजण म्हणतात सर्व काही आधीपासूनच ठरलेले असते. जर तसे असेल तर आपण ते मिळवण्यासाठी का धडपडत असतो? आपल्या मेहनतीला व कष्टाला काय अर्थ उरतो? आपण नेहमी म्हणतो की, सर्व काही आधीपासूनच आपल्या भाळी लिहिलेले असते. त्यानुसारच माणूस जगत असतो. कृती करत असतो. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, तरी अंतिम टप्पा सगळ्यांचा एकच असतो. तो म्हणजे मरण. ते कुणालाच चुकलेले नाही.
माणूस येताना काही आणत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. तरीही तो नाव, पैसा, धन दौलत कमावण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. बऱ्याच वेळा तो अनितीचा, गैरमार्गाचा वापद करुन धनदौलत तर मिळते, पण मानसिक समाधान त्याला कधीच मिळत नाही. तो सतत चिंताग्रस्त अवस्थेत गेल्याने त्याला विविध आजारांचा शिकार व्हावे लागते. पैशाने खोटा तोरा मिरवण्याची साधने मिळतात पण सुखाला वा समाधानाला खरेदी करता येत नाही. आपण अंधश्रद्धेच्या नादात सत्याला मागे टाकत चाललो आहोत. पूर्वनियोजित तसे काहीही नसते, तो फवत आपला भ्रम असतो आणि भ्रमाचा भोपळा केव्हा आणि कधी फूटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ईश्वरी शक्तीपेक्षा, सत्यातली युक्ती मोलाची आहे.