असतं काय..अन् दिसतं काय..!
जे समोर येते तेच आधी योजलेले असते असे अनेकदा होत नाही. विविध कार्यक्रमांच्या आयोजकांना "प्लॅन बी" सुध्दा तयार ठेवावा लागतो. ऐनवेळी कोणती अडचण येईल आणि बदल करावा लागेल याचा नेम नसतो. अगदी चित्रपट, नाटक करतानाही असे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. घर चालवणाऱ्या गृहीणींनीही मनात काहीतरी करायचे ठरवलेले असते; पण दिवसभराच्या प्रवासात त्यांच्या प्राथमिकता बदलत जातात आणि वेगळेच काहीतरी करावे लागते याचा अनुभव महिलावर्गाने वेळोवेळी घेतला असेलच!
हा लेख लिहायला घेताना दिल्लीत रेड फोर्ट रेल्वे स्थानकाजवळ एका कारमध्ये स्फोट होऊन १२ च्या आसपास मृत्यू; तर २० हुन अधिक जखमी झाले होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील एक युग गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते दिलावर खान अर्थात धरमसिंह देओल म्हणजेच धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर सुरु होत्या. मात्र ते त्यातून सावरुन घरी गेल्याचे वृत्त जबाबदार प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ६ नोव्हेंबरला सुंदर गायिका तसेच अभिनेत्री सुलक्षणा पंडित, त्याचप्रमाणे संजय खान यांची पत्नी झरीन हिचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्या सर्व दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली. हे नामवंतांचे मृत्यू होण्याआधीच त्यांच्या निधनांच्या अफवाही काही रिकामटेकड्यांकडून समाजमाध्यमांवरुन पसरवल्या जात होत्या. जे झालेच नाही ते भासवण्यात आपल्याकडील अनेकांनी पीएचडी केलेली असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण यामुळे पसरुन साराच गोंधळ माजतो.
जीवनात हे असेच होत असते बऱ्याचदा. जे आपल्या समोर येते, जे दिसते, जे सादर होते तेच अंतिम धरुन आपण चालतो. पण ते सगळे प्रत्यक्षात उतरण्याआधी बरेच पाणी पुलाखालून वाहुन गेलेले असते..जे अनेकांना माहितही नसते. ‘जंजीर' या एकाच चित्रपटाने अमिताभ हरिवंशराय बच्चन या अभिनेत्याचे दिवस आरपार बदलून टाकले होते. त्याआधी त्याचे ‘सात हिंदुस्थानी'सह अनेक सिनेमे तिकीट बारीवर आपटले होते. याच ‘जंजीर'साठी आधी सुनिल दत्त मग ‘जानी' अर्थात कुलभूषण पंडित म्हणजेच राजकुमार याही अभिनेत्यांकडे प्रकाश मेहरांनी म्हणे विचारणा केली होती. मात्र त्यांनी होकार दिला नाही. पण अमिताभने हा चित्रपट स्विकारला आणि जीव ओतून काम केले. त्याला प्राण, जया भादुरी, अजित यांच्यासह कल्याणजी आनंदजी यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आणि पुढचा सारा इतिहास सर्वांना माहित आहे. ‘देवदास' या चित्रपटासाठी सचिनदेव बर्मन यांनी ‘पिया तोसे नैना लागे रे' या गाण्याची योजना करुन ठेवली होती. पण विविध कारणांनी ते गाणे त्या सिनेमात जाऊ शकले नाही; मात्र १९६५ साली रजतपटावर झळकलेल्या ‘गाईड' सिनेमात हे गाणे आले व त्याचे सोने झाले. हे झाले चित्रपटसृष्टीतलं काय असतं आणि प्रत्यक्षात काय दिसतं..काय समोर येतं ते! पण असं तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनातही वेळोवेळी घडत असतं. त्यातलाच एका ताजा किस्सा मला सर्वांसमोर मांडण्याची अनिवार इच्छा होत आहे.
त्याचं झालं असं की आमच्या ‘आपलं नवे शहर' कार्यालयात दिवाळी फराळानिमित्त एका नामवंत गुणवंताला बोलवावे, सर्व सदस्यांनी आपापल्या घरुन थोडाथोडा फराळ आणावा व त्याचा आस्वाद त्या पाहुण्यासमवेत घ्यावा व त्याच्याशी सुसंवाद साधावा अशी कल्पना मनात आली व गेल्या वर्षी ती प्रत्यक्षात उतरवलीही. ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम व त्यांच्या पत्नीला आम्ही दिवाळीनंतर नवे शहर कार्यालयात बोलावले व त्यांनीही अत्यानंदाने आमंत्रणाचा स्वीकार करुन हजेरी लावली व छान संवाद साधत आमच्या फराळाचा आस्वाद घेतला. मग यंदाही तसे करण्याला आणखी बळ मिळाले. कुणाला बरे बोलवावे? या विचारात असताना माझ्यापुढे सर्वप्रथम आमच्या वर्तमानपत्रात ‘चांगभले' हे सदर चालवलेले ज्येष्ठ साहित्यिक व वाशीनिवासी असलेल्या श्री.साहेबराव ठाणगे यांचे नाव आले. त्यानुसार भल्या सकाळीच त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. पण ‘सपत्निक बोलावताय तर एक व्हाटस् अप संदेश पाठवा व त्यावर पत्नीच्याही नावासह आम्हा उभयतांना निमंत्रित करत आहात असे लिहा' अशी सूचना केली. मीसुध्दा अजिबातच वेळ न दवडता लागलीच त्यांना तशा आशयाचा संदेश आमच्या कार्यालयाच्या पत्त्यासह धाडला. तोवर माझ्या पत्नीने फराळाचे डबे भरुन ठेवले. ते घेऊन कार्यालयाकडे निघायची माझी तयारीही झाली. ...तेवढ्यात साहेबरावांनी माझ्या मोबाईलवर कॉल करुन सांगितले की त्यांच्या अस्थमा आजाराचा रिपोर्ट नुकताच प्राप्त झाला असून त्यानुसार डॉक्टरी सल्ला घेण्यासाठी जावे लागणार आहे व ती वेळ नेमकी तुमच्याकडे येण्याचीच आहे. पुन्हा त्यात किती वेळ जाईल हे सांगता येत नसल्याने ते आटोपून तुमच्याकडे यायला जमेल किंवा कसे याबाबत अंदाज घेणे अवघड आहे.
आता बोंबला! साहेबरावांची अडचण एकदमच रास्त होती. इकडे मी अडचणीत येण्याची वेळ आली होती. आता काय करावे? माझ्या डोळ्यासमोर रा.फ.नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रविंद्र पाटील यांचे नाव आले. मी लागलीच त्यांच्याशी संपर्क साधून तशी त्यांना विनंती करायचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले की ‘एका तातडीच्या कामासाठी दुपारीच गावी जायला निघत आहे. त्यामुळे आजच तुमच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला येणे अवघड आहे.'
वेळ निघून जात होता. चूक माझीच होती. मी समोरच्याला विचार करायला अवधी न देताच थेट बोलावू पाहात होतो. पण तसा हार मानणाराही नव्हतो. वाशी, नेरुळ व नवी मुंबईसह विविध ठिकाणी पोस्ट मास्टर म्हणून सेवा बजावलेले पनवेल निवासी ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांना मी फोन लावला. तीन चार वेळा लागून तो त्यांच्याकडून उचललाच जात नव्हता. (नंतर कळले की पनवेलमध्ये एका ज्येष्ठ महिला साहित्यिके चे निधन झाल्याने ते त्या गडबडीत होते.) आता काय करावे? कर्जतजवळील शेलू येथील एका महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य असलेले व घणसोलीमध्ये इंजिनियरिंगविषयक शिक्षण देणारे, सध्या सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेले ह.भ.प. दिनेश औटी हे माझे चांगले मित्र आहेत. म्हटलं त्यांनाच बोलावू या. त्यांना फोन लावला व माझ्या निमंत्रणाचे स्वरुप सांगितले. त्यावर ते म्हणाले की तुमचा हेतू खूप चांगला आहे. यायलाही आवडेल.. पण सध्या आपण विद्याविहार येथे कॉलेजात असून नवी मुंबईत परतायला संध्याकाळी उशीर होईल.
आता काय बरे करावे? बेत पुढे ढकलता येणार होता. पण मला तो ढकलायचा नव्हता. ऐरोली येथे वास्तव्य करणारे ज्येष्ठ रंगकर्मी व सुमारे १३ विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्थांवर पदाधिकारी असणारे सन्मित्र श्री. रविंद्र औटी यांचे नाव डोळ्यासमोर तरळले व एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांना कॉल लावला व संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दिवाळी फराळासाठी सपत्निक यायचे आहे असे सांगून टाकले. सुदैवाने त्यांना त्या दुपारी दीडनंतर अन्य कोणता कार्यक्रम नसल्याने त्यांनी होकार भरला व मी इकडे सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्या पत्नीलाही सोबत आणावे ही माझी सूचनाही त्यांनी मान्य केली. हे सारे नकार, होकार नाट्य सकाळी ११.३५ ते ११.५४ या एकोणीस मिनिटांत घडले. ‘मी वेळेपूर्वीच तुमच्याकडे आलेला असेन' हेही सांगायला श्री. रविंद्र औटी विसरले नाहीत. ...आणि त्याप्रमाणे ते उभयता त्या संध्याकाळी आलेही. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार केला. फराळाचा सपत्निक आस्वाद घे घेतला. त्यानिमित्त त्यांनी आमच्या संपादकीय मंडळ व अन्य सहकाऱ्यांना शुभेच्छा तर दिल्याच; पण ते सेवा बजावत असलेल्या विविध संस्थांचीही माहिती पुरवली आणि काही संस्थांना भेट देऊन पाहणी करण्याचे निमंत्रणही दिले. श्री औटी हे मूलतः रंगकर्मी असल्याने फर्माईश आल्यानंतर त्यांनी वि. वा. शिरवाडकरलिखित ‘नटसम्राट' या नाटकातील ‘कुणी घर देतं का घर..' हा नाट्यप्रवेश सादर करुन टाळ्याही मिळवल्या. एका चांगल्या सुसंवादासाठी निमंत्रित करुन फराळच्या आस्वादात सामील केल्याबद्दल आभारही मानले. (हल्ली उपचार म्हणून का होईना, आभार मानण्याचा संस्कार अनेकजण विसरत चालले आहेत. लोक जमतात..त्यांच्यातले अनेकजण - काही सन्माननीय अपवाद वगळता.. समोर आलेलं तोंडात टाकतात आणि हात झटकून बाजूला होतात.) एका योग्य व्यक्तीमत्वाला दिवाळी फराळासाठी बोलावल्याबद्दल आनंद झाल्याचे मला सांगायला आमच्या कार्यलयातल्या सहकाऱ्यांमधील अनेक सज्जन विसरले नाहीत.
तर...असा हा सारा एका दिवसाच्या केवळ काही मिनिटांच्या कार्यक्रमाचा होकार-नकाराच्या हेलकाव्याचा प्रवास मी
अनुभवला. असे प्रसंग कित्येक आयोजकांच्या जीवनात वेळोवेळी येत असतात. लोकांना वाटते.. आज आपल्यासमोर जे सादर होत आहे तेच पूर्वनियोजित वगैरे आहे म्हणून. पण जे समोर दिसते अगदी तसेच ते ठरलेले असते अशातला भाग नसतो. त्याआधी पडद्यामागे बरेच काही घडलेले असते. ते तुम्हा सुसंस्कारी वाचकांना सांगावे यासाठीच आजचा हा लेखप्रपंच !
राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई