पंचनामा
१ मे हा दिवस जगभरात कामगार दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. कारण त्या काळात उद्योगपती व कारखानदार लोक, आपल्या कामगाराची पिळवणूक करत त्यांच्याकडून १२ ते १८ तास काम करून घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांना योग्य ती भरपाई म्हणा किंवा पगार देत नसत. त्यामुळे कामगारांचे जीवन जगणे अवघड होत असे, म्हणून तत्कालीन काही समाजधुरिणांनी यावर विचार करून, कामगार युनियन उदयास आणली. त्यात कम्युनिस्ट पार्टीचा मोठा हात होता. या चळवळीचा उदय जसा रशियात झाला, तसाच चीनमध्येही झाला. या काळात कामगार नेत्यांनी कामगारांची बाजू लावून धरली व मालकाकडे या कामगारांच्या अडीअडचणी मांडल्या. परंतू मालकी मंडळी ऐकायला तयार झाली नाही, परिणामस्वरूप या नेत्यांनी संपाचे व काम बंदचे हत्यार वापरले. या संपाने वा काम बंद चळवळीने उद्योगपती व कारखानदार यांचे कामकाज बंद पडले त्यांना त्यातून नुकसान होऊ लागल्याने शेवटी मालक मंडळीनी कामगार नेत्यांचे मान्य करत, कामाचे तास निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे कामगारांच्या पगारातही वाढ करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे नपयाचा काही भाग कामगारांना बोनस म्हणून देण्याचेही ठरले. हा दिवस होता १ मे. तेव्हापासून जगभरात कामगार दिवस म्हणून पाळला जातो. रशियासह जगभरातील कामगारांना न्याय मिळाल्याने या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे.
आपला देश १९४७ साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुवत झाला. भारतात विविधतेत एकता यानुसार कारभार सुरू होता. परंतु, भारत हा देश भौगोलिकदृष्ट्या व भाषिकदृष्ट्या वेगवेगळा आहे. त्यामुळे देशाचा व राज्याचा कारभार करण्यासाठी योग्य त्या प्रांत वा भाषेवार राज्याची गरज भासू लागली. परिणामस्वरूप तत्कालीन केंद्र सरकारने भाषाभर राज्याच्या दिशेने विचार करणे सुरू केले. सुरूवातीला काही राज्यांची निर्मिती करण्यात आली. पण महाराष्ट्र आणि गुजरात या दोहोत बदल केला नाही, तेव्हा भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. प्रथमतः गुजरात व महाराष्ट्र यांचे एकत्रित मुख्यमंत्री माजी प्रधानमंत्री कै. मोरारजी देसाई हे संयुवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जेव्हा मराठी भाषिकासाठी वेगळ्या राज्याची मागणी समोर आली तेव्हा, मोरारजी देसाई यांनी मुंबई ही गुजरातला जोडली जावी अशी मागणी केली. तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने त्याला कडाडून विरोध केला. तेव्हा मोरारजी देसाई यांनी विरोधकांना चिरडून काढण्याचा प्लॅन केला. पण त्यांचा तो प्लॅन मराठी बांधवांनी नेस्तनाबूत करत मुंबई ही महाराष्ट्राची आहे व ती महाराष्ट्रातच रहावी अशी मागणी केली व त्यासाठी एक मोठे आंदोलनही केले. त्या आंदोलनात १०७ मराठी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आंदोलन थांबले नाही. उलट आंदोलनाने अधिक जोर पकडला. ही बाब केंद्राच्या लक्षात येताच त्यांनी मुंबई ही महाराष्ट्राची आहे व ती महाराष्ट्रातच रहावी अशी त्यांची धारणा झाली व त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची घोषणा केली तो दिवस होता १ मे. या नवीन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुवती करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राला देशाच्या तुलनते (म्हणजेच इतर राज्याच्या तुलनेत) प्रगती पथावर नेले. त्यानंतर आलेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून देशातील इतर राज्याच्या तुलनेत अग्रेसर केले. देशात विविध भाषिक राज्ये तयार झाली असली तरी त्यास महाराष्ट्र हा अपवाद आहे. कारण महाराष्ट्र या नावातच ‘राष्ट्र' हा शब्द लपलेला आहे. महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, त्या राज्यातील प्रत्येक माणसाच्या हृदयात राष्ट्रभावना तग धरून आहे.खरंतर या भावनेची रूजूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत उदयास आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी, तत्काली मोगलांच्या झोटींगशाही राजकारणाला व त्यांच्या कारभारालाच विरोध करण्याचा ध्यास घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आसपासच्या तरूणांना एकत्र करून, आपला मनसूबा सांगितला तेव्हा राज्यातील अठरापगड जातीच्या तरूणांनी शिवाजी महाराजांना, त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, त्यांनी आपले तन, मन, धन, अर्पण करण्याचे वचन दिले. केवळ ते वचन देऊन थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या समर्पणाने ते सिध्द करून दाखवले.काही मोजवयाच या तरूणांच्या सहाय्याने त्यांनी प्रथम तोरणा गड काबीज केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर आपला ताबा मिळवत एक लौकिक स्थापन केला.
शिवाजी महाराजांचा तो लौकिक काही मराठी बांधवासह कट्टरपंथीय ब्राह्मणांना पाहवला नाही. काहींनी तर शिवाजी महाराजांना ‘राजा' म्हणूनही मान्यता दिली नाही व त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेव्हा महाराजांना आपला राज्याभिषेक करण्यासाठी काशीवरून ब्राह्मणाला बोलवावे लागले. त्या भटजीने किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक घडवून आणला. तरीही काही ब्राह्मणांनी व त्यांच्याच जातकुळीतील विरोधकांनी, महाराजा विरोधात कट कारस्थाने सुरू केली, पण महाराज हे द्रष्टे राजे होते, त्यांचा सामाजिक व राजकीय अभ्यास गाढा होता. प्रत्येक मोहिमेची आणखी करताना त्यातील भावी अडचणीचा अभ्यास करून त्यातून मार्ग कसा काढायचा याचाही ते विचार करत. म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा' ही उपाधी मिळाली. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात व रयतेत कधी भेदभाव केला नाही. उच्च-निच हा भेदभाव पाळला नाही. त्यांच्या सैन्यात व दरबारात अठरापगड जातीच्या लोकांचा भरणा होता. आणि त्यांच्या रवतात महाराष्ट्र बाणा भरलेला होता.
महाराजांनी राज्याचा कारभार नीट चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते. त्यांचा खजिनदार ब्राह्मण, न्यायाधिश ब्राह्मण, तर सेनापती म्हणून शूरविरांचा भरणा होता; तर दारूगोळाचा रक्षक एक मुसलमान होता. रयतेविषयी त्यांचे स्पष्ट मत होते की, राज्यातील सर्व घटक गुण्यागोविंदाने राहातील तसेच बायाबापड्यांवर कोठेही अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता ते घेत. केवळ ते स्वतःच स्त्रियांचा मान राखत तर त्यांनी सर्वांनाच स्त्रियांचा आदर राखण्याची सवत ताकीदच दिली होती. सुरतेच्या लुटीत खजिन्यासह तेथील सरदाराची देखणी सून पकडून आणून त्यांना महाराजासमोर हजर केले असता, त्यांनी तिला पकडून आणणाऱ्यांना तंबी दिली व स्त्रीची खणानारळाने ओटी भरून तिची रवानगी सुरतेला केली. त्यावेळी त्या सुंदर स्त्रिचे वर्णन करताना महाराज म्हणाले "अशीच सुंदर आमची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो.”
त्याच महाराजांचे पाईक म्हणवणारे तथाकथित शिव सैनिक आज कसे वर्तन करत आहेत? सुरूवातीला तरूणीला ताई म्हणायचे, त्यानंतर तिला काई - बाई म्हणत तिच्याशीच लगट करून ‘ताईची सखी' करताना दिसतात. काही स्त्रिया त्यांच्या गळाला लागत नाहीत त्यांना बदनाम करण्याच्या कारवाया करताना दिसतात. ज्यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत त्यांची तर विचारसरणी बघायला आणि बोलायला नको. आज देशातील केंद्र सरकारात आणि विविध राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या अनेक मंडळींना इतिहासाचा गंध नाही. त्यावर ही मंडळी आपली अवकल पाजळताना कशाचा संबंध कशाशी जोडतात. जेव्हा तसे काही मुळात नसतेच. त्यांच्या या विधानावर इतिहासाचे अभ्यासकही चव्वून जातात. त्यांना आपली स्वतःचीच लाज वाटायला लागते की, माझा कोणता अभ्यास अपूरा राहिला?
त्यापैकीच एक आपले महाराष्ट्राचे एक आमदार नामे संजय गायकवाड यांनी एक बखेडा तयार केला आहे. त्यांनी पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून, त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला नको तशा शिव्या देत आपले महाराजाविषयीचे प्रेम व आस्था दाखवून देत म्हटले "तुमची हिम्मतच कशी झाली की, महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याची?”
जेव्हा ते पुस्तक ३८ वर्षापूर्वी प्रकाशित झाले आहे, त्याच्या लाखो प्रती छापल्या व विकल्या गेल्या आहेत. त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही, तर त्यांनी खऱ्या शिवाजीची ओळख करून घेतली आहे. कारण काहींनी शिवाजीविषयी अर्धवट माहिती देत शिवाजीला बदनाम केले होते. - भिमराव गांधले