तुषारकी

आज नरसिंह जयंती. भक्तिभाव, उत्साह आणि एक वेगळीच ऊर्जा घेऊन आलेला हा दिवस. सकाळी मंदिरात घंटानाद घुमतो, फुलांचा सुगंध दरवळतो आणि मन नकळत त्या उग्र.. तरी करुणामय रूपाकडे वळते. नवी मुंबईतील नेरुळ येथील बालाजी मंदिरात आपल्याला नरसिंहाचे दर्शन होते. मंदिरातील नरसिंहाची मूर्ती पाहताना एकाच वेळी भव्यता आणि शांतता दोन्ही अनुभवायला मिळतात. जणू त्या रूपात संपूर्ण परंपरेचा प्रवास सामावलेला आहे.

नरसिंह... नाव घेताच मनात दोन टोकांचे भाव उभे राहतात. एक म्हणजे अन्यायावर झेपावणारी ज्वाला आणि दुसरे म्हणजे भक्तासाठी ओसंडून वाहणारी करुणा. या दोन टोकांच्या मध्येच भारतीय मूर्तिशास्त्रात नरसिंहाची प्रतिमा आकार घेत गेली. ही केवळ एक कथा नाही, तर काळानुसार बदलत गेलेली एक जिवंत परंपरा आहे. प्रारंभीच्या नरसिंह प्रतिमा पाहिल्या की एक वेगळाच शांतपणा जाणवतो. आंध्र प्रदेशातील प्राचीन ठिकाणी सापडलेल्या मूर्ती असोत किंवा पंचवीरांच्या ओळीत दिसणारा नरसिंह असो, त्यात उग्रतेपेक्षा स्थैर्य अधिक दिसते. सिंहमुख आहे, हातात आयुधे आहेत, पण चेहऱ्यावरची ती तीव्रता अजून पूर्ण उमटलेली नाही. जणू हा अवतार अजून कथेत प्रवेश करत आहे. या प्रतिमा सांगतात की सुरुवातीला नरसिंह हा एक प्रतीक होता, संरक्षणाचा आणि शक्तीचा. गुप्तकाळात येताना या प्रतिमांना एक वेगळी दिशा मिळते. या काळात अनेक नरसिंह मूर्ती तयार झाल्या, पण त्यात विशेष वेगळेपण दिसत नाही. सर्वसाधारण वैशिष्ट्ये, ठराविक आयुधे आणि एक संयत रूप. हिरण्यकशिपू वधाचा प्रसंग येथे ठळकपणे दिसत नाही. जणू कलाकार अजून त्या निर्णायक क्षणाचा शोध घेत आहे. या काळातील नरसिंह शांत आहे, नियंत्रित आहे. त्याच्या अस्तित्वात शक्ती आहे, पण ती अजून उलगडायची आहे.

मात्र काळ पुढे सरकतो आणि दक्षिण भारतात नरसिंहाचे रूप अचानक जिवंत होते. येथे तो केवळ देव नाही, तर एक क्रियाशील शक्ती बनतो. हिरण्यकशिपूला उखडून टाकणारा, त्याच्या छातीत नख रोवणारा नरसिंह शिल्पात प्रकट होतो. या प्रतिमांमध्ये हालचाल आहे, ताण आहे, नाट्य आहे. संगम काळातील उल्लेखही याच उग्रतेची साक्ष देतात. येथे नरसिंह केवळ पाहण्याची प्रतिमा नाही, तर अनुभवण्याची घटना बनतो. पण या उग्रतेच्या मध्यातूनच एक वेगळा प्रकार पुढे येतो, 9केवळ नरसिंह”. येथे तो एकटा आहे. ना युद्ध, ना राक्षस, ना नाट्य. तो बसलेला आहे, हातात शंख, चक्र, गदा आहे, पण चेहऱ्यावर शांतता आहे. ही शांतता खोल आहे, ध्यानमय आहे. जणू सर्व संघर्षानंतर मिळालेली स्थिरता. या प्रतिमांमध्ये भक्ताला भीती वाटत नाही, उलट एक आधार मिळतो.

नवी मुंबईतील बालाजी मंदिरातील नरसिंह मूर्तीसमोर उभे राहिल्यावर हीच भावना प्रकर्षाने जाणवते. त्या मूर्तीमध्ये उग्रतेचा सूचक आविष्कार आहे, पण त्याचवेळी एक आश्वासक स्थिरता आहे. भक्त म्हणून आपण त्या रूपात संरक्षण शोधतो, तर अभ्यासक म्हणून त्या रूपात इतिहासाचा प्रवास दिसतो.

नरसिंहाच्या या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. ही प्रतिमा कधीच एकसाची राहिली नाही. प्रत्येक काळाने, प्रत्येक प्रदेशाने तिला आपल्यापरीने आकार दिला. कधी ती उग्र झाली, कधी संयमित, कधी ध्यानस्थ. ही बदलती रूपे आपल्याला सांगतात की देव ही केवळ एक स्थिर कल्पना नाही. तो आपल्या भावनांनुसार, आपल्या गरजांनुसार बदलत राहतो. कदाचित म्हणूनच नरसिंह आजही आपल्याला जवळचा वाटतो. अन्यायाविरुद्ध उभे राहायचे असेल, तर त्याचे उग्र रूप प्रेरणा देते आणि मन अस्थिर झाले, तर त्याचे शांत रूप आपल्याला स्थिर करते. या दोन्ही टोकांच्या मध्येच त्याची खरी ओळख दडलेली आहे.

आज नरसिंह जयंतीच्या निमित्ताने, त्या उग्रतेला आणि त्या शांततेला एकत्र नमस्कार करण्याचा दिवस आहे. दगडात कोरलेल्या त्या प्रतिमेकडे पाहताना, आपणही आपल्या आतल्या अस्थिरतेला शांत करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित हाच नरसिंहाचा खरा संदेश आहे. - तुषार म्हात्रे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बुद्ध आणि स्वामी विवेकानंद