डाईंग कंपनीला भीषण आग
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी मधील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला ७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचा कपडा जळून खाक झाला असून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीचे स्वरुप इतके रौद्र होते की, धुराचे प्रचंड लोट अनेक किलोमीटर दूरवरुन दिसत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सरवली एमआयडीसी मधील मंगलमूर्ती डाईंग या तळ अधिक दोन मजल्याच्या कपडा साठवलेल्या कंपनीला भीषण आग लागली. यावेळी कंपनीत सकाळी ६० ते ७० कामगार काम करत होतेे. त्यावेळी अचानक आग लागली. कंपनीत आग लागल्याचे पाहताच सर्वच कामगारांनी कंपनीमधून बाहेर पळ काढला. यानंतर काही क्षणात आगीने संपूर्ण कंपनीचा परिसर वेढला गेला. कपड्यांचा साठा आणि रासायनिक पदार्थ असल्यामुळे आग वेगाने भडकली. आग इतकी भीषण होती की, पाहता पाहता आगीने संपूर्ण कंपनी वेढली जाऊन इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला संपूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
सदर घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तातडीने कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या पथकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. उशिराने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले. तर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु होते. कंपनीत मोठ्या प्रमाणात कपड्याचा साठा असल्याने संपूर्ण माल जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे. पण, सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून फक्त वित्तहानी झालेली आहे.