राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय प्रांगणात आंतरशालेय क्रीडा महोत्सव सुरु  

नवी मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिका संचालित रबाळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई'चे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आंतरशालेय क्रीडा महोत्सव २०२४-२०२५' राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय मैदानात सुरु झाला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त (शिक्षण विभाग) संघरत्ना खिलारे, कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका सौ. रंजना सोनवणे, माजी नगरसेविका गौतमी सोनवणे यांच्यासह विद्यालय मधील  शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गरीब, अगदी दारिद्र्‌य रेषेखाली असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसराला सुधाकर सोनवणे यांनी टप्प्याटप्प्याने सुधारले, चांगले स्वरुप दिले, दोन शाळांची स्थापना करुन गोरगरीब मुले-मुलींसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. पैशाने गरीब असलेला परिसर ज्ञानाने समृध्द करण्याचे काम सुधाकर सोनवणे यांनी केले आहे. हाडाचे कार्यकर्ते असणारे सुधाकर सोनवणे, महापौर झाल्यानंतरही रबाळे परिसरातच राहून येथील लोकांसाठी काम करत राहिले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि कार्यकर्ते धर्म, जात, पंथ, वर्ण, पक्षाच्या पलीकडे जाऊन कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला आणखी गती मिळो', असे मनोगत यावेळी ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करताना त्यांनी दिलेला  ‘शिक्षणाबरोबर सर्वांचा सर्वांगीण विकास', हाच संदेश आपण पाळतो आहोत. रबाळे परिसर गोरबरीब, कामगारांची वस्ती आहे. या परिसरामध्ये सुधाकर सोनवणे, सौ. रंजना सोनवणे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी महापालिकेबरोबर येऊन शैक्षणिक कार्य उभे केले आहे. सुधाकर सोनवणे यांनी सुरु केलेल्या दोन शाळांमध्ये आज जवळपास ४,५०० विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुढे जाऊन या शाळांतील मुलांना वैज्ञानिक वातावरण मिळावे, यासाठी प्रयोगशाळा, ग्रंथालये उभारण्याचा महापालिका प्रशासनाचा निश्चय आहे, असे यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी  नमूद केले.

३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या या क्रीडा महोत्सवाची सांगता आज ५ जानेवारी रोजी होणार आहे. या क्रीडा महोत्सवात ५ महापालिका शाळा, ५ खाजगी अनुदानित शाळा मिळून एकूण १० शाळांतील २००० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग आहे.

या क्रीडा महोत्सवात चेंडू फेकणे, अंक मोजणे, धावणे, अक्षर ओळखणे, अडथळा शर्यत, पिक अप युवर नेम, चमचा लिंबू धावणे, रंग ओळखणे, गोणी रनिंग, वर्ड मेकिंग, लंगडी, शब्द साखळी, दोरी उडी, बुध्दीबळ, कॅरम आदी विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे.

रबाळे या कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये राज्य, देशस्तरीय दर्जाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवाला राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचे आभार. रबाळे वस्तीतील मुले-मुलींमध्ये शिक्षणाविषयी, खेळाविषयी आवड निर्माण होत आहे. क्रीडा क्षेत्रात रबाळे परिसरातील मुले-मुली विविध स्तरावर पोहचताहेत, हीच मोठी गोष्ट आहे. यासाठी मुले-मुलींना क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी समाजसेवक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. - सुधाकर सोनवणे, माजी महापौर - नवी मुंबई. 

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्वांची सामुहिक जबाबदारी -ना. प्रताप सरनाईक