महापालिकेच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ येथील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढत असून सदर रुग्णालय म्हणजे स्वस्त आरोग्यसेवेच्या नावाखाली नागरिकांची धुळफेक असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारींबाबत आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून १० डिसेंबर रोजी महापालिका सभागृहात ‘रुग्णालय नियंत्रण समिती'ची बैठक घेऊन याबाबत विचारणा केली.
रुग्णालयात तक्रार पेटी नसणे, रुग्णालयात उर्मट वागणारे बाऊन्सर, महापालिकेचा एकही कर्मचारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपस्थित नसणे, महात्मा फुले आणि अन्य राज्य, केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेचा काही प्रमाणात लाभ मिळतो, मात्र डेंग्यू-मलेरिया सारख्या आजारांवर उपचार केले जात नाही. सायंकाळ नंतर तातडीच्या रुग्णांना दाखल न करणे, या आणि इतर अनेक तक्रारी असून या रुग्णालयात शहरातील नागरिकांना अत्यंत अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना या उलट अनुभव येत आहे, आदि मुद्दे यावेळी आ. कुमार आयलानी यांनी उपस्थित केले. कोव्हीड काळात कंत्राटी पध्दतीने कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली .
रुग्णालयाशेजारी डायलेसिस सेंटर, चिल्ड्रन वॉर्ड आणि पेडियाट्रिक्स, मॅटर्निटी वॉर्ड, एमआरआय मशीन, आदि तत्काळ व्यवस्था करण्याचे मान्य करण्यात आले. रुग्णालयासाठी लवकरच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये यासाठी डॉक्टर, महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, याशिवाय ज्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे, त्यांची तपासणी करुन घ्यावी. शक्य असेल तर मोफत उपचार पुरवण्यात यावे, असे आमदार आयलानी यांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल रुग्णांबाबत आवश्यक माहिती दिल्यानंतर देखील अनावश्यक माहिती विचारण्यात येते. जोपर्यंत सदरची माहिती मिळत नाही तोपर्यंत उपचार सुरु केले जात नाही. काही रुग्णांचे रेशनकार्ड रेशन न घेतल्याने आणि अन्य कारणांमुळे बाद झालेले असते. या सबबी खाली रुग्णांवर उपचार नाकारण्यात येतो, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केला आहे.
रुग्णालयाच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी आ. कुमार आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार यापुढे केले जातील. यासाठी जो खर्च होईल तो खर्च महापालिकेकडून करण्यात येईल. रुग्णालयात नेमलेल्या सर्व बाऊन्सर्सची नेमणूक रद्द करण्यात यावी त्या ऐवजी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयुवत विकास ढाकणे यांनी बैठकीत दिली.
तर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत आम्ही गंभीर रुग्णांवर उपचार करतो, त्यासाठी आवश्यक स्टाफ आमच्याकडे उपलब्ध आहे. सर्व शासकीय आरोग्य सेवांचा लाभ रुग्णांना देण्यात येतो. आम्ही महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक तीच कागदपत्रे रुग्णांकडून मागतो. त्याशिवाय कोणतेही कागदपत्रे मागितले जात नाहीत, असे स्पष्टीकरण रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अक्षय लोंढे यांनी दिले.
सदर बैठकीला कल्याणच्या आ. सुलभा गायकवाड, अंबरनाथचे आ. डॉ बालाजी किणीकर, रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. पॉल, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.