वसई-विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम

विरार : थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत १२ व्या ‘वसई-विरार महापालिका मॅरेथॉनमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चभ्रू खेळाडुंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. ८ डिसेंबर रोजी देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये ५८ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.

तत्पूर्वी ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती साक्षी मलिक हिने सहभागी १५ हजार धावपटुंना या स्पर्धेची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झेंडा दाखवला.

२ तास १८ मिनिटे आणि १९ सेकंदांच्या वेळेसह साताऱ्याच्या कालिदास हिरवे याचा कोर्स रेकॉर्ड केवळ ५ सेकंदांनी हुकला. परंतु, त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. हिरवे याला बक्षीस म्हणून ३ लाख रुपये मिळाले. हिरवे यांच्या ५ सेकंद मागे त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला. दोन वेळा विजेता, दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोड याने २ः१९ः०६ वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

या स्पर्धेत ४० किलोमीटरपर्यंत पहिले तीनही स्पर्धक एकमेकांच्या अगदी जवळच्या अंतरावर होते. त्यानंतर तिसऱ्या विजयाच्या मार्गावर असलेला मोहित राठोड मागे राहिला. शेवटच्या लॅपमध्ये माझ्या शरीराने सहकार्य केले नाही. मी प्रथमच तिसरे स्थान पटकावत आहे. मी पुढच्या वर्षी परत येईन आणि कोर्स रेकॉर्डसह जिंकण्याचा प्रयत्न करेन, असे राठोड याने सांगितले.

पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नौदलाच्या रोहित वर्माने नितेश रथवाला केवळ १ सेकंदाने मागे टाकत अव्वल दोन स्थानांसाठी फोटो-फिनिश केले. उल्लेखनीय म्हणजे अव्वल ५ धावपटुंनी २०१९ मध्ये अनिश थापाने सेट केलेला १ः०४.३७ चा कोर्स रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडून काढला आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील नोंदवली. वर्मा याला बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले. दरम्यान, १७ किमीपर्यंत आघाडीवर असलेला कोल्हापूरचा दीपक कुंभार पोटरीच्या दुखण्याशी झुंजत होता आणि तो रथवापेक्षा ३ सेकंद मागे तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला.

दुसरीकडे सोनिका (ती तिचे आडनाव वापरत नाही), हरियाणातील शेतकऱ्याची मुलगी आणि रेल्वे कर्मचारी असून तिने महिलांची अर्ध मॅरेथॉन १ः१३.२२ या वेळेसह जिंकली. सदर केवळ एक कोर्स रेकॉर्ड नाही तर तिची वैयक्तिक सर्वोत्तम देखील आहे. उजालाच्या नावावर २०२२ मध्ये जुना विक्रम १ः१३.३३ होता.

हरियाणाची भारती १ः१३.५१ गुणांसह दुसऱ्या तर उल्हासनगर मधील महाविद्यालयीन विद्यार्थि साक्षी जड्याल १ः१४.५१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. 

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

‘रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉन'मध्ये ३ हजार धावपटुंचा सहभाग