बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले

गृहिणींचे कीचन बजेट पुरते कोलमडले

नवी मुंबई : राज्यात भाज्यांच्या उत्पादनात आधीच घट  झाली आहे. त्यात  पडत असलेल्या पावसामुळे  वाहतूक दरम्यान शेतमाल भिजत आहे. त्यामुळे वाशीतील  एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी बाजारात मागील  आठ ते दहा दिवसांपासून  दरात सातत्याने वाढ होऊन दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात ३० ते १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या भाज्या किरकोळ बाजारात ८० ते १६० रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहेत. त्यामुळे गृहिणींचे कीचन बजेट पुरते कोलमडले असून ही महागाईची झळ अजून एक महिना अशीच राहील असे मत येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

 मागील काही दिवसांपासून  पडत असलेला जोरदार पाऊस आणि हवामानात होणारे बदल याचा परिणाम भाज्यांचा उत्पादनावर होत आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात आवक कमी होत आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला भिडतात. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत  भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. यात सर्वाधिक दर टोमॅटोचे व  हिरव्या वाटण्याचे वाढले असून त्या खालोखाल हिरवी मिरची,  गवार, भेंडी, शिमला मिरची, वांगी, फरसबी, आले यांचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात भाज्यांनी पन्नाशी पार  करत शंभराच्या घरात दर पोचले आहेत. तर किरकोळीत शंभरी पार करत भाज्यांनी नवीन  उच्चांक गाठला  असून आहे. पावसाचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर होत आहे.  अजुन एक ते दीड महिना गृहिणीना भाज्यांकरिता अधिक खर्च करावा लागणार आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटो, हिरवी मिरची आणि आले यांनी शंभरी पार केली आहे. घाऊक मध्ये टोमॅटो १०० रुपये तर किरकोळीत १५० रुपयांवर विक्री होत आहेत. किरकोळमध्ये हिरवी मिरची १६० रुपये तर घाऊक मध्ये १२० रुपये ,एपीएमसीत अद्रक २०० रुपये तर किरकोळ बाजारात २६० रुपये किलोने विक्री होत आहे.

पावसामुळे  सध्या भाज्यांचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची ३०% - ४०%आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढले असून दर स्थिर होण्यास अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. - तानाजी चव्हाण, व्यापारी, भाजीपाला मार्केट एपीएमसी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘परिवहन विभाग'चे प्रधान सचिव पराग जैन यांचे इड्युस पार्क कंपनीला निर्देश