प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींमध्ये टेकू लावून काम सुरु

‘एपीएमसी'मधील अतिधोकादायक इमारतींवर पालिका कारवाई करणार का?

वाशी : नवी मुंबई शहरातील अतिधोदायक इमारतींचा वापर थांबवण्यासाठी महापालिकेने ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मागील अनेक वर्षापासून अतिधोकादायक इमारतींचा वापर सुरु असून या ठिकाणी रोज हजारो घटकांची  वर्दळ असते. पण, या इमारतींना खाली करण्यासाठी महापालिका कधी रस दाखवणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरात दरवर्षी पावसाळापूर्व शहरातील धोकादायक इमारतींची यादी महापालिकेकडून जाहीर केली जाते. यंदा महापालिकेने शहरातील ५२४  धोकादायक इमारती जाहीर केल्या असून त्यापैकी ६१ इमारती अतिधोकादायक (सी वन) श्रेणीत मोडणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे नेरुळ येथील धोकादायक इमारतीमधील घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी धोकादायक इमारती ४८ तासाच्या आत खाली करण्याच्या सूचना केल्या असून कडक कारवाई करण्यात येत आहे.

मुंबर्ई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा बाजारातील गाळे, प्रशासकीय इमारत तसेच मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक, धोकादायक घोषित करण्यात आल्या असताना देखील त्याचा आजही वापर सुरु आहे. एपीएमसी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी नेहमीच वाहनांची, व्यापारी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. बाजारात प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींमध्ये टेकू लावून काम सुरु आहे. त्यामुळे सदर ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल करत शहरातील इतर इमारतींप्रमाणे एपीएमसी आवारातही महापालिका कारवाई करणार का?  असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अतिधोकादायक इमारतींमधील उपहारगृहाचे नुतनीकरण?
वाशीतील कांदा-बटाटा बाजार समितीतील प्रशासकीय इमारतीसह संपूर्ण कांदा-बटाटा मार्केट धोकादायक म्हणून महापालिकेने घोषित केले आहे. मात्र, या बाजार आवारातील धोकादायक यादीत समाविष्ट असलेल्या उपहारगृहांचे परवाने नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव एपीएमसी मालमत्ता विभागाने संचालक मंडळाच्या बैठकीत आणला आहे. तुर्तास संचालक मंडळाची सभा जरी स्थगित झाली असली तरी सदर प्रस्ताव तयार करताना एपीएमसी मालमत्ता विभागाला धोकादायक इमारतींना बजावण्यात आलेल्या नोटिसींचा विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत एपीएमसी मालमत्ता अधिकारी सतीश हिंगे आणि अभियंता मेहबूब व्यापारी यांना विचारले असता त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धोकादायक इमारतींना नवी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. शहरातील अतिधोकादयक इमारती खाली करण्यात येत आहेत. त्यामुळे एपीएमसी मधील अतिधोकादायक इमारतींच्या वस्तुस्थितीचा आढावा घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांच्याकडून १० लाख बियांचे रोपण