‘एपीएमसी'मध्ये कांदा वधारला

प्रतिकिलो ४ ते ६ रुपयांची वाढ

वाशी : वाशी येथील ‘मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समिती'मध्ये (एपीएमसी) टोमॅटो सह इतर भाज्या महाग होत चालल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ आता कांदा देखील वधारत चालला आहे. कांदा दरामध्ये  प्रतिकिलो मागे कमीत कमी ४ ते जास्तीत जास्त ६ रुपयांनी वाढ झाली आहे. ४ जुलै रोजी बाजारात पावसामुळे आवक कमी झाली असून सर्वच बाजारात कांदा वधारला आहे. बाजारात प्रतिकिलो दराने १६ ते २० रुपयांनी कांदा विक्री होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘एपीएमसी'मध्ये कांद्याचे दर स्थिर होते. परंतु, मागील दोन दिवस बाजारात आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात. पावसाळ्या आधी ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी असते. पावसाळा सुरु झाल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यात आणि त्यानंतर कांद्याचे दर आणखी वधारतात. त्यामुळे पावसाळापूर्व तयारी म्हणून ठेवणीचे कांदे साठवणूक करण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा बाजारात अवकाळी पावसामुळे साठवणुकीचे कांदे भिजल्याने दर्जा घसरला होता. त्यामुळे मे महिन्यात ठेवणीतला कांदा खरेदीला ग्राहकांची मागणी रोडावली होती.

‘एपीएमसी' घाऊक बाजारात प्रतिकिलो ४ ते ६ रुपयांनी कांद्याची दरवाढ झाली असून सर्वात उच्चतम प्रतिचा कांदा आधी १३ ते १५ रुपयांनी उपलब्ध होता, तो आता १६ ते २० रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात ४ जुलै रोजी पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. तसेच राज्यातील सर्वच बाजारात समितीत कांद्याचे दर वधारले असल्याने ‘एपीएमसी'मध्येही त्याचा परिणाम जाणवत आहे. - मनोहर तोतलानी, व्यापारी-कांदा-बटाटा मार्केट . 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१५ जुलैपर्यंत कधीही नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त?