छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
टोमॅटोचे उत्पादन घटल्याने वाशीतील घाऊक बाजारात आवक घटली
टोमॅटोचे उत्पादन घटल्याने वाशीतील घाऊक बाजारात आवक घटली
किरकोळ बाजारात टोमॅटो दराची शंभरी पार
वाशी ः टोमॅटोचे उत्पादन घटल्याने वाशीतील घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातच टोमॅटो ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. परिणामी, किरकोळ बाजारात टोमॅटो पेट्रोल पेक्षा महाग झाले असून १२० ते १४० रुपये किलो दराने विकला जात आहे. तर येत्या काही दिवसात टोमॅटोचे उत्पादन वाढले नाही तर टोमॅटो आणखी महाग होऊन १५० रुपये पार होणार असल्याची माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली आहे.
वाशी मधील एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोची होणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ होत चालली आहे. मागील एक दीड महिन्यापूर्वी टोमॅटो २ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने नाशिक मध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे पाठ फिरवली. परिणामी, बाजारात टोमॅटोची आवक प्रचंड कमी जाणवत असून मागणी सातत्याने वाढत आहे.
मागील आठवडा भरापूर्वी बाजारात टोमॅटोच्या सरासरी ३० ते ३५ गाड्या दाखल होत होत्या. तर ४ जुलै रोजी १८ गाड्या बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने बाजारात टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाशीतील घाऊक बाजारात ४ जुलै रोजी ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला गेला. तर किरकोळ बाजारात टोमॅटोला १२० ते १४० रुपये प्रतिकिलो दर होता. त्यामुळे जर उत्पादन वाढले नाही तर लवकरच टोमॅटोचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असून ‘एपीएमसी'मध्ये शंभरी तर किरकोळ बाजारात १५० रुपये दर गाठण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.