पनवेल शहरात दिवाळीपूर्वी वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

पनवेल : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी वर्दळ केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी तहसिल कचेरी परिसर, रेल्वे स्थानकाकडून पनवेल शहरात येणारा मार्ग तसेच मुख्य मार्गांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या कोंडीचा त्रास रुग्णवाहिकांना सुध्दा सहन करावा लागला.

चारचाकी वाहने घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या वाढल्याने शहरातील वाहनतळ पूर्ण भरले असून, पार्किंगसाठी जागा मिळेनाशी झाली आहे. परिणामी, वाहन चालकांनी गाड्या उपलब्ध जागेत उभ्या केल्याने रस्त्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पोलीस चौकी परिसरातच काही वाहन चालक आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा वेग पूर्णपणे खंडीत होत आहे. रस्त्याच्या कडेला दिवाळीच्या पणत्या, फटाके, रांगोळी साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांनी पादचारी मार्ग आणि रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. त्यामुळे तीन आसनी रिक्षा आणि दुचाकीस्वारांना मार्ग काढणे कठीण बनले आहे. काही ठिकाणी केवळ १-२ पोलीस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक नियंत्रणात अडचणी येत आहेत.

पनवेल महापालिकेकडून वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डन नेमण्यात आले असले तरी परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच पादचारी मार्गांवर चहाचे ठेले, सायकल दुरुस्ती दुकाने आणि छोट्या मोठ्या दुकानदारांनी बस्तान बांधले असल्याने अतिक्रमणविरोधी पथकाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रबाळे पोलिसांचा उपक्रम- विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे समुपदेशन