रबाळे पोलिसांचा उपक्रम- विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे समुपदेशन  

नवी मुंबई : घणसोली परिसरात राहणाऱया दहावीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने परिसरात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करुन रबाळे पोलिसांनी सकारात्मक पावले उचलत शिक्षक व शाळा प्रशासनासाठी विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि मानसिक आरोग्य संवर्धन मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. या कार्यक्रमात ऐरोली व घणसोलीतील सुमारे 35 शाळेमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.  

शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी ऐरोली सेक्टर 8 येथील म्हात्रे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, शैक्षणिक ताण, कौटुंबिक समस्या, सोशल मीडियाचा दडपणात्मक प्रभाव आणि एकटेपणा या कारणांमुळे मुलांमध्ये नैराश्य वाढताना दिसत आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वात जवळचा मार्गदर्शक असतो. म्हणूनच त्यांच्या मनातील भावनिक ताण ओळखून वेळेवर त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच सर्व शाळा प्रशासनाने शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत अशा सुचना केल्या.  

तर महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यविषयक संवेदनशीलतेवर भर देतानाच, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण टाकण्याऐवजी त्यांना समजून घेणारी मैत्रीपूर्ण शिक्षक भूमिका आजच्या काळात अधिक महत्त्वाची आहे. तु कमी पडतोस असे म्हणण्याऐवजी तू करु शकतोस ही प्रेरणा देण्याची गरज आहे. इंटरनेट, इंस्टाग्राम व व्हॉट्सऍपचा वापर वाढला असून बहुतांश विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे वर्षा काळे यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘राष्ट्रवादी'ची वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत दिवाळी साजरी