३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
उत्सवप्रियता ही स्वाभाविकच! पण....
व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, ती उत्सवप्रिय असते. या उत्सवप्रियतेला श्रध्देय देवीदेवतांच्या नावे साजरे केले जाणारे विविध सण, उत्सव हे बळकटी देण्याचे काम करत असतात. ख्रिश्चन, बौध्द, हिंदु, मुस्लिम, पारशी, ज्यू, जैन असे कोणतेही धर्म घेतले तर त्या त्या धर्मांचे अनुयायी त्यांचे वर्षभर येणारे सण, उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरे करताना दिसतील आणि त्याला कुणाची हरकत असण्याचे काहीही कारण नाही. मात्र तसे करताना त्याचा इतरांना उपद्रव होणार नाही, कुणाचा अवमान होणार नाही एवढी काळजी घेणे महत्वाचे असते.
यंदा १४ ते २३ मार्च दरम्यान मित्रपरिवार आणि काही नातेवाईक मंडळी उत्तराखंड राज्यात पर्यटनानिमित्त गेलो होतो. तेथील मुक्कामात नैनिताल, भिमताल, रानीखेत, कौसानी, जिम कार्बेट, रामनगर, हरिद्वार, चंडीदेवी, राम झुला, लक्ष्मण झुला हे सारे पाहताना मनसा देवी मंदिरालाही भेट देण्याचा योग आला होता. तुम्ही बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येईल की हिंदुधर्मीयांची कित्येक श्रध्दास्थाने, देवळे-राऊळे-मंदिरे ही उंच पर्वतराजीत, टेकड्यांवर, डोंगरामध्ये आहेत. याला कारण असे सांगितले जाते की मानवी कोलाहलापासून दूर उंचावर जाऊन देवदेवता वसल्या व तेथून त्यांनी मानवांवर कृपादृष्टी ठेवणे पसंत केले. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग झाला. पण लोक तेथेही देवांना एकटे सोडेनात! तेथेही भाविक जाऊन गर्दी करु लागले. रांगा लाऊ लागले. रांगा मोडू लागले. ढकलाढकली करु लागले. मंदिर प्रशासनाच्या सूचना अव्हेरु लागले. याच्या परिणामस्वरुपी मंदिर-देवस्थाने येथेही चेंगराचेंगरी होऊ लागली व त्यात भाविक म्हणवणारे लोक थेट देवाघरीच निघून जाऊ लागले. ताजी घटना उत्तराखंडच्या मनसा देवी मंदिरात रविवार दिनांक २७ जुलै रोजी घडली व तेथील चेंगराचेंगरीत सहा जणांना मृत्यू आला व २८ हुन अधिक लोक जखमी झाले आहेत.
अलिकडे अनेकांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळत असल्याने किंवा जवळ पैसा नसला तरी ‘प्रसंगी कर्ज काढीन.. पण देवदर्शन करीनच' या मानसिकतेचेही अनेकजण असल्याने वर्षाच्या कोणत्याही महिन्यात कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या तरी देवस्थानाकडे जात येत असतातच. आता तर श्रावण महिना सुरु असल्याने तर बोलायचे कामच नाही. मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन भाविक मृत्युमुखी पडण्याची घटना ही काही पहिलीच नव्हे. हिंदुच काय, विविध धर्मीयांच्या विविध तीर्थक्षेत्री अधून मधून अशा घटना सातत्याने घडत आल्या आहेत, काहींना याचा विसर पडला असेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो...जगभरातील मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मक्का मशिदीबाहेर २४ सप्टेंबर २०१५ या दिवशी हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ भाविकांचे प्राण गेले व ७० हुन अधिक जखमी झाले होते. मनसा देवी मंदिरात ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली त्याच दिवशी २७ जुलै रोजी पूर्व कांगो मध्ये कोमांडा मधील कॅथॉलिक चर्च वर इस्लामिक स्टेट समर्थक बंडखोरांनी एका चर्चवर हल्ला करुन २१ जणांचा जीव घेतला. जगातील कोणताही धर्म अशा प्रकारच्या घातपात, दुर्घटना, अपमृत्यू यातून सुटलेला नाही. यहुदींच्या सामुहिक हत्या, गॅस चेंबरमध्ये काेंडून परधर्मियांना ठार मारणे, पहलगामसारखे धर्म विचारुन केले गेलेले जीवघेणे हल्ले, भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून हिंदुधर्मियांची प्रेतांनी भरलेली ट्रेन येणे, कश्मिरमधील स्थानिक पंडितांच्या हत्या वगैरे वगैरे घटनांमधून प्राणाला मुकलेल्यांची संख्या ध्यानात घेतली तर एखाद्या राष्ट्राच्या लोकसंख्येइतकी ती भरावी. ...आणि या सगळ्याच्या मुळाशी काय ? तर धर्मच! पुन्हा वर बोलायला मोकळे की ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना.' मग या हत्यांना काय म्हणावे बरे?
वर्णवर्चस्व, अहंकार, श्रेष्ठत्वाचा खोटा गर्व, आपलाच धर्म मोठा हे सांगण्याचा बडेजाव, धार्मिक विस्तारवाद, इतरांनी एखाद्या धर्माची तत्वे मान्य करुन तो स्विकारण्याऐवजी तलवारीच्या जोरावर, लव्ह जिहाद किंवा धार्मिक बाटवाबाटवी करुन लोकांना तो धर्म स्विकारण्याची सवती वगैरे वगैरे गोष्टी या सगळ्याच्या मागे आहेत हे सांगण्यासाठी कुणा इतिहासकाराची किंवा सामाजिक विश्लेषकाची अजिबातच गरज नाही. म्हणजे बघा.. शांती, अमन, सुख, समाधान, आबादीआबाद, आनंद, भरभराट यासाठी ज्या परमोच्च शक्ती, ईश्वर, अल्ला, गॉड किंवा अन्य कुणा अढळ श्रध्दास्थानाला शरण जायचे, त्याच्याकडून आशिर्वाद मिळवायचे आणि पुन्हा त्याच्याच नावावर नृशंस हिंसाचार करुन इतरांचे जीव घ्यायचे, त्यांना अपमानित करायचे, शरणार्थी बनवायचे, त्यांच्या मनाविरुध्द स्वतःच्या धर्माची सक्ती त्यांच्यावर करायची, भेदभाव करायचा! अशाने कोणता देव, अल्ला, गॉड तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, तुमच्या भल्याचे करणार आहे? पण हे लक्षात घ्यायची कुणाची मानसिकता दिसत नाही. आणि यात तथाकथित पुढारलेल्या राष्ट्रांचे म्होरकेही आघाडीवर दिसताहेत हे अधिक दुःखदायक!
व्यवती कोणत्याही धर्माची असो, ती उत्सवप्रिय असते. या उत्सवप्रियतेला श्रध्देय देवीदेवतांच्या नावे साजरे केले जाणारे विविध सण, उत्सव हे बळकटी देण्याचे काम करत असतात. ख्रिश्चन, बौध्द, हिंदु, मुस्लिम, पारशी, ज्यू, जैन असे कोणतेही धर्म घेतले तर त्या त्या धर्मांचे अनुयायी त्यांचे वर्षभर येणारे सण, उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरे करताना दिसतील आणि त्याला कुणाची हरकत असण्याचे काहीही कारण नाही. मात्र तसे करताना त्याचा इतरांना उपद्रव होणार नाही, कुणाचा अवमान होणार नाही एवढी काळजी घेणे महत्वाचे असते. आता श्रावण महिना सुरु झाल्याने हिंदु धर्मातील अनेक सणांना नागपंचमी नंतर प्रारंभ झालेला आहे. येत्या ९ तारखेला रक्षा बंधन अर्थात राखीपौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा येत आहे. खरे तर रक्षा बंधन व भाऊबीज हे दोन्ही सण भावा-बहीणींतील प्रेमळ अनुबंधांच्या स्वरुपात कौटुंबिक, घरगुती, व्यवतीगत स्तरावर साजरे केले जातात. त्यात कोणताही भपका, आवाजाचे प्रदूषण, रोषणाईचा बडेजाव, रस्त्यांची अडवाअडवी, गर्दी-रस्त्यातील रेटारेटी यांचा दूरान्वयानेही संबंध नसतो. याच प्रकारचे विविध सण वेगवेगळ्या धर्मांत वारंवार आले असते तर काय बहार आली असती! ढोल ताशे, बॅण्ड, भोंगे, फटाकेबाजी हा सारा भाग मानवी संस्कृतीच्या प्रारंभीच्या काळात कुठेही नव्हता. धर्माच्या काही अतिउत्साही अनुयायांनी नंतर तो घुसडला असे समजायला जागा आहे. समाजात अनेकजण देवाधर्माचं करताना दिसतील. घरची पूजाअर्चा, तीर्थस्थळी जाऊन केलेली आराधना, मंत्रपठण, उपासतापास, व्रतवैकल्ये हे सारे विविध धर्मांत आधीपासूनच आहे. ती ज्याने त्याने करण्यास कुणाचाच मज्जाव नाही, नसावा. सात्विक, निरागस, व्यसनमुवत, देवप्रेमी, देशप्रेमी, निसर्गाशी कृतज्ञ असण्याला कुणाचा विरोध का बरे असावा? निसर्गातून आलो व निसर्गातच आपण विलिन होणार आहोत असल्याचे मान्य करणारे अनेक भाविक हे पंचमहाभूते तसेच निर्मिक अर्थात दैवी, पारलौकिक, अतिंद्रिय शक्तीप्रति श्रध्दाभाव ठेवतात, त्यांना पूजतात, भजतात. काही धर्मांत सुर्याला केंद्रस्थानी.. तर काही धर्मांत चंद्राला केंद्रस्थानी कल्पून त्यांची आराधना केली जाते, त्यांच्या नावे व्रतवैकल्ये केली जातात. त्याचबरोबर अग्नीदेवतेलाही पारशी धर्मात प्राधान्याने पूजले जात असते. हे सारे निसर्गाप्रति उतराई असण्याचे विविध मार्ग! मात्र काही धर्मांचे बदमाष अनुयायी यातही भेदाभेद करु लागले. मानवा-मानवात, एकाच धर्मांच्या विविध अनुयायांत जाती, वर्ण, वंश यावरुन त्यांनी गटबाजी, वर्गवारी सुरु केली व जे काही येते ते केवळ आम्हालाच..बाकीच्यांना तो अधिकारच नाही असे करत त्यांनी देवादिकांची एजण्टगिरी आपल्याकडेच असल्याचा भ्रम पसरवला. लिहीणे, वाचणे, अभिव्यक्त होणे अवघड असण्याचा काळात तो भ्रम काही काळ टिकला खरा. पण ज्ञानाने, माहिती तंत्रज्ञानाने लवकरच ते सारे धुडकावून लावले आणि सर्वांसाठी अभ्युदय साधण्याची कवाडे खुली करुन टाकली.
आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना ज्यामुळे रोजगार, प्रतिष्ठा, लोकमान्यता, समाजमान्यता, राजमान्यता मिळत असते त्यांना त्यांना ते आपापले दैवत मानतात. घरातले देव देवता हे लोक श्रध्देने तर पूजतातच; पण त्यांना लाभदायक ठरलेल्यांसाठीही पराकोटीचा कृतज्ञभाव ठेवतात. मग ती व्यक्ती असो की यंत्र! जसे एखादा सश्रध्द डीटीपी ऑपरेटर काम सुरु करताना त्याच्या समोरच्या संगणकाची, लॅपटॉपची, प्रिंटरची, स्कॅनरची पूजा करतो. त्यावर फुले, कुंकू वाहतो. एखादा कामगार ज्या मशिनवर काम करतो तिला नमस्कार करुनच कामाची सुरुवात करतो. अगदी मानाचे पुरस्कार मिळवणारे रंगकर्मीसुध्दा ते स्विकारायला जेंव्हा विचारमंचावर जातात तेंव्हा त्या विचारमंचाच्या पायरीला नमस्कार करुनच ते पुढचे पाऊल टाकतात. ही झाली आपल्याला हे चांगले दिवस दाखवणाऱ्यांप्रति सश्रध्द कृतज्ञता व्यवत करण्याची समाजमान्य रीत. जिचा आपल्यालाही आनंद होतो व आपल्याला तसे करताना पाहुन कुणालाही वाईट वाटत नाही, दुःख होत नाही की कुणाला त्याबद्दल हेटाळणी कराविशी वाटत नाही. मग आपले सण, उत्सव, श्रध्देय दैवते, तीर्थस्थळे यांच्याही बाबतीत हे सारे आपल्यापुरते, इतक्या सहजपणे, कुणालाही न दुखावण्याच्या स्वरुपातले करत गेलो तर खऱ्या अर्थाने विविध धर्मीयांत शांततामय सहजीवन, सलोखा, एकात्मता हे सारे साध्य करता येणार नाही काय? चेंगराचेंगरी, धवकाबुवकी, परस्पर विद्वेष, खूनखराबा, हल्ले, जातीय-धार्मिक दंगली या सगळ्याच बाबी टाळता येतील.
तुम्हाला याबाबत काय वाटते?
राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई