३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
तृतीयपंथी : एक दुर्लाक्षित घटक
आपल्या सरकारने जर तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी सरकारी नोक-या, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केंद्रे, सरकारी मदत, उदयोगधंदयासाठी सवलती, यांचे विवाह, यांचे सणवार, विशेष दवाखाने, त्यांचे अंत्यविधी अशांसाठी मदत केंद्र उपलब्ध करून दिले तर भविष्यात आपल्याला आयपीएस, आयएएस, डॉक्टर्स, वकील, इंजीनिअर, शास्त्रज्ञ, संशोधक, कुशल कामगार, साहित्यिक, गायक, चित्रकार, संगीतकार, पायलट, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ऑफीसर्स, उदयोगपती, प्रशिक्षित कर्मचारी मिळु शकतील.
आजवर आपण पाहीलेले तृतीयपंथी हे रस्त्यावर भिक मागताना, एखाद्या शुभ प्रसंगी बक्षिसी मागताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये लाडीकपणाने लगट करून पैसे वसुलताना वा रात्री बेरात्री शरीर विक्रय करताना दिसलेले आहेत. यामुळे आपल्या बहुताशांच्या मनात यांच्याविषयीचे मत हे पूर्वग्रहदूषित झालेले आहे.
खरं तर निसर्गतः पृथ्वीवर नर आणि मादी अशा दोनच प्रजाती निर्माण होतात. परंतू नर आणि मादी अशा दोन्हींच्या मधली जी व्यक्ती जन्माला येते त्या व्यक्तीतील शारीरीक बदलांमुळे एक तर त्यांच्या अंतरंगात एक प्रकारचं युध्द सुरू होत जे कोणालाही दिसत नाही. तसेच हे गुपित विश्वासाने घरच्यांसमोर वा समाजासमोर उघड केलं तरीही ९९ % आपलीच अशा बदलातील व्यक्तीला स्विकारत नाही. (एक वेळ शारीरीक व्यंग असलेल्यांना स्विकारतात; परंतु अशांना का स्विकारत नाहीत हा एक पश्नच आहे) मग सरतेशेवटी त्यांना नाईलाजास्तव वरील मार्ग स्विकारावा लागतो.
परंतू कालानुरूप चित्रपट, माहीतीपट, रिल्स, वृत्तपत्रांमधील यांच्याविषयी लिहीले गेलेले लेख तसेच सामाजिक संस्था करीत असलेल्या जनजागृतीमुळे जनसामान्यांच्या मनात यांच्या विषयीचे गैरसमज काही प्रमाणात दुर होत चाललेले दिसत आहेत. ‘लक्ष्मी' नामक तृतीयपंथी उच्चशिक्षीत आहे. परंतु ती तीला आजवर येत असलेल्या वाईट अनुभवांविषयीच्या संवेदना आणि जनमानसात त्यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीबद्दल तीचे विचार अत्यंत परखडपणे मांडत आलेली आहे. त्यांना दिली जाणारी वागणुक आणि त्यांच्याकडुन करून घेत असलेल्या घृणास्पद कामाविषयीची माहीती ती व तीच्या सारखे अनेक तृतीयपंथी जगासमोर मांडत आलेली आहेत. यास आपण म्हणजे आपला समाजच कसा जबाबदार आहे याची आपल्याला वेळोवेळी जाणिवही करून दिलेली आहे.
आज तृतीयपंथी नाईलाजास्तव त्यांना न आवडणारी कामे करीत आहेत. या जगात अनेक तृतीयपंथी मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या सुदृढ असुन उच्चविदयाविभुषीतही आहेत. अनेक जणं कौशल्यपुर्ण शिक्षणात पारंगत आहेत. तरीही ते सन्मानजनक काम मिळण्यापासुन वंचित आहेत. आपल्याकडुन ते नोकरीची, रोजगाराची अपेक्षा करतात. परंतु आपल्यापैकी कोणीही त्यांना त्या लायक समजत नाहीत. आपल्याकडे त्यांच्यासाठी कुठलीही ठोस सरकारी योजना नाहीत, त्यांच्यासाठी बँकेत कर्ज सुविधा नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र दवाखाने, विश्रामगृहे, शाळा कॉलेजेस, पुनर्वसन केंद्र नाहीत. मग त्यांनी काय करावे? कुठे जावे? कुठे ना कुठे यास आपले सरकार आणि आपणच जबाबदार नाही का ?
आपल्या सरकारनं जर का यांच्या पुनर्वसनासाठी यांना सरकारी नोक-या, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केंदे, सरकारी मदत, उदयोगधंदयासाठी सवलती, यांचे विवाह, यांचे सणवार, यांच्यासाठी विशेष दवाखाने, यांची अंतिम कार्ये अशांसाठी मदत केंद्र उपलब्ध करून दिले तर भविष्यात यांच्यामधुनच आपल्याला आयपीएस, आयएएस, डॉक्टर्स, वकील, इंजीनीअर, शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, कुशल कामागार, कवी, लेखक, गीतकार, गायक, चित्रकार, संगीतकार, पायलट, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ऑफीसर्स, मोठमोठे उदयोगपती आणि प्रशिक्षित कर्मचारी मिळु शकतील. (बघा.. किती मोठ्या प्रमाणात आपल्या देशातील मानव संसाधन आपण व्यर्थ घालवतोय ते!)
आपण नेहमी सहज यांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही भिक का मागता? तुम्ही चांगली नोकरी का करत नाहीत? पण खरं तर हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा की का आपण एखाद्या तृतीयपंथीयास नोकरी मिळुन देण्यासाठी प्रयत्न केला आहे का? खरी गरज आहे ती आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची, आपल्याला पुढाकार घेण्याची, आपल्या समाजातील अंध, अपंग, विधवा, वृध्द आणि गोरगरीबांना जसे आपण मानसन्मान देतो त्याच मानसन्मानाचे हेही हकदार नाहीत का ?
मग आताच संकल्प करू या नेटका! आपल्यातल्या अशा व्यक्तीला यापुढे पडु दयायचा नाही एकटा ! - ॲड निरंत वासुदेव पाटील, नेरूळगाव