आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन' स्पर्धेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांची अभूतपूर्व कामगिरी

उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू नाथा ताम्हाणे यांनी आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन' स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करुन महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील बस्लटन येथे आयोजित या स्पर्धेत विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहभाग घेत जगभरातून आलेल्या १७०० स्पर्धकांमध्ये आपले स्थान निर्माण केले.

ऑस्ट्रेलियातील ‘आयर्न मॅन' स्पर्धा म्हणजे केवळ एक शारीरिक चाचणी नसून ती मानसिक खंबीरतेचा आणि जिद्दीचा सर्वोत्तम नमुना मानली जाते. विष्णू ताम्हाणे यांनी ३.८ किमी जलतरण, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी. मॅरेथॉन धावणे अशा कठीण टप्प्यांतून मार्गक्रमण करत सलग १७ तासांच्या आत सदर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ‘आयर्न मॅन' स्पर्धेत जगभरातून १७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी केवळ ११०० स्पर्धकांनी सदर स्पर्धा पूर्ण केली. महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह विष्णू ताम्हाणे, विजय अनपट आणि संदीप पाचपुते यांनी या आव्हानात्मक स्पर्धेत भाग घेतला. ताम्हाणे यांच्या सोबत त्यांचा १८ वर्षीय मुलगा गौरंग ताम्हाणे यानेही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली.

विष्णू ताम्हाणे यांना स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगसाठी तज्ञ प्रशिक्षकांचा मार्गदर्शन लाभले. स्विमिंगसाठी संजीवन वालावलकर, सायकलिंग आणि धावण्यासाठी चैतन्य वेल्हाळ, तर स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी विजय गायकवाड यांनी त्यांना तयार केले. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचा आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. विष्णू ताम्हाणे यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे आणि स्पर्धेसाठी परवानगी देणारे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि त्यांचे सहकारी यांचे योगदानही या यशामागे महत्त्वाचे ठरले.

‘आयर्न मॅन' स्पर्धेत अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. थंडी, वारा, पाऊस अशा प्रतिकुल हवामानातही स्पर्धक आपली कामगिरी बजावतात. स्पर्धेचे ब्रीदवाक्य "Everything is Possible" या प्रेरणेने विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या ५६ व्या वर्षी सदरचे धाडस दाखवले. 

Read Previous

केबीपी कॉलेजच्या अंशुमन झिंगरानचा जलतरणमध्ये विश्वविक्रम

Read Next

शुभम वनमाळी याची आणखी एक सागरी मोहीम फत्ते