शुभम वनमाळी याची आणखी एक सागरी मोहीम फत्ते
नवी मुंबई : तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी याने पुन्हा गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू असे १७ किलोमीटर सागरी अंतर ३ तास ३७ मिनिटात पोहून पार केले आहे. शुभमने १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.१२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून पोहण्यास सुरुवात करुन १०.४७ वाजता अटल सेतू गाठले.
‘महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएशन'च्या माध्यमातून सदर स्विम करण्यात आले होते. या महिमेचा मार्ग नेव्हल डॉकयार्डच्या बाजुने पुढे मिडल ग्राऊंड कोस्टल बॅटरी या नेव्हीच्या टेहाळणी पॉईंटला वळसा घालून बुचर आयलंड आणि घारापुरी लेणी यांच्या मधून अटल सेतू असा होता.
स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु केल्यामुळे गेले ६ महिने पोहण्याच्या सरावाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे सदर स्विम करण्याबद्दल साशंकता होती. परंतु, शेवटच्या क्षणी संपूर्ण टिमशी चर्चा करुन मोहीम हाती घेतली. फक्त एक दिवसाच्या सरावाअंती याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे माझ्यासाठी ध्येय कठीण होते. परंतु, अनुभव कामी आला आणि मोहिम फत्ते करु शकलो, असे या मोहिमेबद्दल बोलताना शुभम वनमाळी याने स्पष्ट केले. या स्विम साठी प्रशिक्षक रुपाली रेपाळे, अनिरुध्द महाडिक, वडील धनजंय वनमाळी, आई दिपिका वनमाळी आणि नावाडी दिलीप कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.