क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ‘स्वच्छ-अंमली पदार्थमुक्त नवी मुंबई'चा नारा
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय प्राधिकरणांतील अधिकाऱ्यांनी एकमेकांसोबत सहकार्याची भूमिका ठेवत नवी मुंबई शहर स्वच्छतेत देशात प्रथम आणण्यासाठी आणि ड्रग्ज फ्री करण्याकरिता मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना जागृतीचा संदेश दिला. स्वच्छ, सुंदर-ड्रग्ज फ्री नवी मुंबई करण्याकरिता जनजागृतीपर या मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ‘नवी मुंबई प्रेस क्लब'च्या माध्यमातून सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडियम येथे करण्यात आले होते.
दरम्यान, या क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या नवी मुंबई पोलीस संघाने बाजी मारली. तर महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभागी झालेला ‘एमएमआरडीए'चा संघ उपविजेता ठरला आहे.
आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जर प्रत्येक नागरिकाने उचलली तर निश्चितच नवी मुंबई शहर या देशातील स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक शहर म्हणून लवकरच नावारुपास येईल. स्वच्छतेत जरी शहर देशात तिसऱ्या क्रमांकावर असले, तरी स्वच्छतेसोबतच नवी मुंबई शहर अंमली पदार्थ मुक्त (ड्रग्ज फ्री) आणि सायबर सेपटीच्या अनुषंगाने देखील देशातील सुरक्षित शहर म्हणून अव्वल क्रमांकावर आणण्याची शपथ यावेळी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी-लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी यावेळी घेतली.
स्वच्छ नवी मुंबई मिशन आणि ड्रग्ज फ्री-सायबर सेपटी नवी मुंबई शहर करण्याच्या उद्देशाने ‘नवी मुंबई प्रेस क्लब'तर्फे खेळविण्यात आलेल्या या मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई पोलीस, नवी मुंबई वाहतूक पोलिस, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, आरटीओ (नवी मुंबई व पनवेल), एमएसआरडीसी, एमएमआरडीए, कोकण विभागीय महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार आदींचे संघ सहभागी झाले होते.
साखळी पध्दतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत नवी मुंबई पोलीस, नवी मुंबई महापालिका, एमएमआरडीए तसेच लोकप्रतिनिधी-पत्रकार या चार संघांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यातून नवी मुंबई पोलीस आणि एमएमआरडीए या दोन संघांनी अंतिम फेरीत मजल मारली होती. अखेर यात नवी मुंबई पोलीस संघाने बाजी मारली.
या स्पर्धेमध्ये पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक दिलिप ढोले, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, संजय पाटील, तिरुपती काकडे, रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय पालांडे, अमोल यादव, विजय देशमुख, संजय जाधव, ‘एमएसआरडीसी'चे नियोजन विभाग संचालक जितेंद्र भोपळे, नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त शरद पवार, किसनराव पलांडे, पनवेल महापालिका उपायुक्त कैलास गावडे, डॉ. बाबासाहेब राजळे, लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखापरीक्षक निलेश नलावडे आणि इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता.