शाळांची झाडाझडती

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग तर्फे १ ऑगस्ट पासून  विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविले जात असून, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणाऱ्या या महाअभियान मध्ये आठवड्यातील ४ दिवस शिक्षणाधिकारी शाळा तपासणी करणार असल्याने शाळांमधील शिक्षकांची परीक्षा होणार आहे. या अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. या अभियानात  विद्यार्थी गुणवत्ता विकास संदर्भातील अहवाल सर्व शिक्षण अधिकारी आणि शाळांना तयार करावा लागणार असल्याने शिक्षकांची चांगलीच दमछाक होणार आहे.शाळांमधील विद्याथार्ी-विद्यार्थिनींच्या पाठीवरील दप्तराचे वजन  कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष काय स्थिती आहे, पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग होतो किंवा नाही, शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे, आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी कोणत्या पध्दतीने केली जाते, गणवेशाची उपलब्धता काय आहे, या आणि अशा अनेक योजनांची तसेच उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून ‘विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान' अंतर्गत घेतली जाणार आहे. या अभियानात विद्यार्थी गुणवत्ता विकास संदर्भातील अहवाल तयार करताना सर्व शिक्षण अधिकारी आणि शाळा मुख्याध्यापकांची कसोटी लागणार आहे.राज्य शालेय शिक्षण विभाग तर्फे राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार असल्याने एकूणच शाळांची झाडाझडती होणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे, त्यानंतर चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे, अशा पध्दतीने या अभियानाची कार्यदिशा ठरवण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदावरील अधिकारी यांनी सोमवार, शुक्रवार वगळता इतर दिवस शाळा भेटी द्याव्या लागणार आहेत. याशिवाय सरल पोर्टलवरुन केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी,  शिक्षण अधिकारी, प्राचार्य, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्रत्येक शाळांना भेटी दिल्यानंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल लॉगिन मधून दररोज अद्यावत करावा लागणार या सर्वांचीच कर्तबगारी उघड होणार आहे. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत शाळांच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहेत काय?, याची खातरजमा विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दरम्यान केली जाणार असल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्वच कारभार चव्हाट्यावर येणार आहे. एकूणच विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हिताचे ठरणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

लहान मुले-मुली असुरक्षित