लहान मुले-मुली असुरक्षित

बदलापूर शहरातील आदर्श विद्या प्रसारक मंडळ संचालित शाळेत दोन लहान मुलींवर गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील अल्पवयीन मुले-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर मधील शाळेमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला. या घटनेच्या निषेधार्थ हजारो बदलापूरवासियांनी रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन केले. या आंदोलनाला आलेल्या हिंसक स्वरुपामुळे बदलापूर शहरात मोठा तणाव देखील निर्माण झाला होता. शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांना नवी मुंबई शहर देखील अपवाद नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत देखील बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची आकडेवारी सांगत आहे. राज्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या (पोक्सो) घटनांची आकडेवारी चिंताजनक आहे. सद्यस्थितीत लहान मुले-मुलीही सुरक्षित राहिली नसल्याचे बदलापूरसह राज्यातील इतर भागात मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनानंतर उघडकीस येत आहे. २१व्या शतकातील आधुनिक शहर अशी बिरुदावली मिरवित असलेल्या नवी मुंबई शहरात देखील बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ हेत असल्याचे आकडेवारीवरुन निदर्शनास येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२४ या ८ महिन्यांच्या कालावधीत बलात्कार आणि विनयभंगाच्या २२५ घटना घडल्या आहेत. यातील १०३ गुन्ह्यांची नोंद १८ वर्षांपेक्षा लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची असल्याचे उघडकीस आले आहे. यात ६०बलात्काराच्या (पोक्सो) तर ४३ विनयभंगाच्या २ (पोक्सो) घटनांची नोंद पोलीस ठाणे मध्ये करण्यात आली आहे.  पोलिसांनी बाललैंगिक अत्याचाराच्या या गुन्ह्यातील ८५ आरोपींना अटकसुद्धा केली आहे. तसेच, त्यापैकी ४४ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपी पीडित मुलीचे नातेवाईक, मित्र, प्रियकर, ओळखीचा व्यक्ती, प्रशिक्षक-शिक्षक असल्याचे आढळून आले आहे. मुलींना चॉकलेट, खाऊ किंवा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे किंवा थेट शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. अनेकदा दमदाटी करुन, जीवे मारण्याची धमकी किंवा अश्नील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले जात असल्याचे अनेक प्रकरणात आढळून आले आहे. अनेक प्रकरणात आरोपी नातेवाईक असल्यामुळे पोलीस ठाणे पर्यंत प्रकरण पोहोचतच नसल्याचे देखील आढळून आले आहे.           

अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार होतो. बरेचदा ओळखीच्या लोकांकडून लहान मुले-मुली अत्याचाराला बळी पडतात. या पार्श्वभूमीवर पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. शाळा आणि खासगी आस्थापनांमध्येही अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. लहान मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पालकांच्या तक्रारी आल्यास पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तक्रारदारांना ताटकळत न ठेवता तत्काळ गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी