नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
निष्काळजीपणाचे फलित
‘एकविसाव्या शतकातील सुनियोजित, आखीव-रेखीव शहर', अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहरात एक-दोन दिवस संततधार पाऊस पडल्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार आता दरवर्षीच घडत आहेत. यावर्षी महिनाभर उशीराने पाऊस पडायला सुरुवात झाली. पण, जुलै महिन्यात संततधार पडलेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नवी मुंबई महापालिका द्वारे करण्यात येणाऱ्या मान्सून पूर्व नालेसफाई कामाबद्दल कोणी नवी मुंबईकर सुजाण नागरिकाने शंका उपस्थित केली तर ती चुकीची म्हणता येणार नाही. नवी मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी तंुबू नये म्हणून दरवर्षी महापालिका द्वारे मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते. याशिवाय नवी मुंबई शहरातील बंदीस्त गटारे वर्षातून तीन वेळा साफ करण्यात येतात. मात्र, मान्सूनपूर्व नालेसफाई झाल्याचा दावा दरवर्षी महापालिका प्रशासनाने केल्यांनतरही नवी मुंबई शहरातील काही भागात पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नवी मुंबई शहरातील गटारे, नाले यांची साफसफाई व्यवस्थित केली जाते काय?, असा प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे. महापालिका तर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी नवी मुंबई शहरातील मोठे नाले आणि गटारे यांची साफसफाई करण्यात येते. मात्र, दरवर्षी महापालिका द्वारे मान्सूनपूर्व गटारे, नालेसफाई करण्यात येत असतानाही दरवर्षी पावसाळ्यात ऐरोली, रबाले, कोपरखैरणे, घणसोली, महापे, तुर्भे, सानपाडा या भागामधील भुयारी मार्गात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. याशिवाय झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत गटारे तुंबून झोपडपट्टी मधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार देखील दरवर्षी घडत असतात. महापालिका द्वारे नवी मुंबई शहरातील अंतर्गत छोटी गटारे वर्षातून दोन ते तीन वेळा साफ केली जातात. मात्र, गटारे, नाले यांची मान्सूनपूर्व साफसफाई करुनही संततधार बरसलेल्या जलधारांमुळे संपूर्ण नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे गटारे, नाले साफसफाईच्या नावाखाली केवळ दिखाव्यापुरता दर्शनी भागातील गाळ काढला जातो काय?, गटारे सफाईच्या नावाखाली प्रत्यक्षात संपूर्ण गटाराची साफसफाई होत नाही काय?, असेही प्रश्न नवी मुंबईकरांनी उपस्थित केले तर त्यांना दोष देता येणार नाही. संपूर्ण नाले, गटाराची साफसफाई होत नसल्याने नाले आणि गटारांतील मुख्य गाळ तसाच राहून पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी नवी मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचून त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो, असे दरवर्षीचेच झाले आहे. एकविसाव्या शतकातील आधुनिक नवी मुंबई शहर एक-दोन दिवस संततधार पाऊस पडल्यानंतर जलमय होते, याला महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे फलित समजायचे काय?. दरवर्षी महापालिका द्वारे मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते. याशिवाय नवी मुंबई शहरातील बंदीस्त गटारे वर्षातून तीन वेळा साफ करण्यात येतात. मग, मान्सूनपूर्व नालेसफाई, बंदीस्त गटारे यांची खरोखर साफसफाई करण्यात येते की कंत्राटदारांकडून नालेसफाई, बंदीस्त गटारे सफाई करण्याऐवजी केवळ कागदोपत्री ‘हातसफाई' करण्यात येते काय?, असा प्रश्न नवी मुंबई शहरातील सुजाण नागरिकांना सतावणे साहजिकच आहे. मुसळधार पावसाचा फटका वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील व्यापारी आणि शेतकरी यांना बसण्याचे आता दरवर्षीचेच झाले आहे. पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर वाशी मधील मॅपको मार्केट रस्त्यापासून ते एपीएमसी मार्केटचा पूर्ण परिसर जलमय होतो. परिणामी रस्त्यावर तुडुंब साचलेल्या पाण्यातून पायवाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एकूणच नवी मुंबई मध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने नवी मुंबई महापालिका आणि एपीएमसी प्रशासन करीत असलेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामाचीही पोलखोल होत आहे. पण, लक्षात घेतो कोण?.