१४ गावांच्या विकासाचा मार्ग सुकर

अखेर बरीच अवती अन्‌ भवती होऊन कल्याण ग्रामीणमध्ये असलेल्या १४ गावांचा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आल्याने या १४ गावातील विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. ठाणे महापालिका लगतच्या कल्याण ग्रामीणमधील १४ गावांना नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याचा तसेच १४ गावांच्या विकासाचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील आणि १४ गाव सर्वंपक्षीय विकास समिती यांनीी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. तसेच विधानसभा अधिवेशनात देखील कल्याण तालुक्यातील दहीसर, पिंपरी, वालीवली, मोकाशी, गोठेघर, उत्तरशिव, नागांव, निघु, नावाळी, नारिवली, भंडार्ली, बाळे, वाकळण, बाभळी या १४ गावांचा नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये समावेश करण्याचा मुद्दा आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी वारंवार उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन  कल्याण ग्रामीणमधील १४ गावे नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा २४ मार्च २०२२ रोजी केली होती. त्यानंतर कल्याण ग्रामीणमधील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करायला राज्य नगरविकास विभागाने मंजुरी दिली होती.१४ गाव सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी मागील काही काळापासून कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा नवी मुंबई महापालिका मध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा नवी मुंबई महापालिका मध्ये समावेश करण्याचा आदेश ९ जुलै २०२४ रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी काढला आहे. या निर्णयामुळे कल्याण ग्रामीण भागामधील १४ गावांना मोठा दिलासा मिळाला असून, या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुनियोजितपणे विकास करणे शक्य होणार आहे. कल्याण तालुक्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव आणि गोटेघर आदी १४ गावे २००० पर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर कल्याण ग्रामीणमधील १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. नवी मुंबई महापालिका मधून सदर १४ गावे वगळण्याचा वाद इतका टोकाला गेला होता कल्याण ग्रामीणमधील १४ गावातून निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने नवी मुंबई महापालिका मधून सदर १४ गावे वगळली. या काळात कोणतेही ठोस नियोजन प्राधिकरण नसल्याने या १४ गावांचा विकास रखडला होता. त्यामुळे कल्याण ग्रामीणमधील १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरु लागली. अखेर शासनाने कल्याण ग्रामीणमधील १४ गावे नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर १२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना जारी करुन १ महिन्यात हरकती आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या एक महिन्यात कोकण विभागीय आयुक्त (महसूल) यांच्याकडे एकही हरकत न आल्याने या १४ गावांचा नवी मुंबई महापालिका मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब झाल्याने कल्याण तालुक्यातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये होणार कधी?, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे कल्याण तालुवयातील १४ गावात विकास कामे करण्याचा आराखडा महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी बनवल्याने या १४ गावांमध्ये विकासपर्व सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

निष्काळजीपणाचे फलित