मोर्चा, आंदोलने, उपोषण आणि महाराष्ट्र!

मोर्चा, आंदोलने ही  संविधानिक आयुधे आहेत. मात्र केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शनासाठी करणे हा एकमेव हेतू हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. त्याहीपेक्षा भयंकर वास्तव म्हणजे दिवसेंदिवस या कृतींना मिळणारा प्रचंड प्रतिसाद. मग त्या नेत्यांचे होणारे जंगी स्वागत, त्यांच्यावर जेसीबीमधून होणारी पुष्पवृष्टी, त्यांच्या तापयातील मोठ्या गाड्या, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधा, सुरक्षा, आणि या सर्वासाठी होणारा प्रचंड खर्च  या सर्वासाठी पैसा कुठून येतो? याची तपासणी होते का?

मागील काही वर्षांत महाराष्ट्राची वस्तुस्थिती आणि परिस्थिती बघितली तर या सर्व संविधानिक आयुधामध्ये महाराष्ट्र गुरफटत चालला आहे. याचा अर्थ ही आयुधे वापरू नयेत असा नाही. पण ही सर्व आयुधे हल्ली व्यक्तिकेंद्रित होऊ लागली आहेत.

एखाद-दोन अपवाद सोडले तर या सर्व आयुधांचे नेतृत्व करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत असतात. बाकी त्यांना शेतकरी, जनता, सर्वसामान्यांचे प्रश्न-समस्या यांच्याशी काहीही देणेघेणे नसते.

आज आपण बघितलं तर या सर्व आंदोलनांचे विषय काय? तर  संविधान बचाव म्हणून भारत यात्रा, जातीपातीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करणारे वातावरण आणि आता तर मतचोरी व मतदार यादीतील घोळ यावरून मोर्चे. यात शेतकरी हा मुद्दा निश्चितच योग्य आहे. हे मुद्दे नक्कीच महत्वाचे असले तरी ते सूचना, सनदशीर आणि न्यायाच्या मार्गाने सुटू शकतात.

पण त्यासाठी न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढणे आणि तोही केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शनासाठी करणे  हा एकमेव हेतू हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. त्याहीपेक्षा भयंकर वास्तव म्हणजे  दिवसेंदिवस या कृतींना मिळणारा प्रचंड प्रतिसाद. मग त्या नेत्यांचे होणारे जंगी स्वागत, त्यांच्यावर जेसीबीमधून होणारी पुष्पवृष्टी, त्यांच्या तापयातील मोठ्या गाड्या, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधा, सुरक्षा, आणि या सर्वासाठी होणारा प्रचंड खर्च  या सर्वासाठी पैसा कुठून येतो? याची तपासणी होते का?

सर्वसामान्य करदात्याचा जर कर भरायचा राहिला तर त्याला दंड आकारला जातो. मग या साऱ्या खर्चाचे ऑडिट होते का?
आणखी एक विदारक चित्र म्हणजे या सर्व आंदोलनांना मिळणारा तरुणांचा प्रचंड पाठिंबा. पण त्यांच्या रोजीरोटीचे काय? राज्यात बेरोजगारी इतकी भयंकर असताना हेच नेते त्यांच्या रोजगारासाठी आंदोलन का करत नाहीत? राज्यात रोजगारनिर्मितीसाठी, उद्योगांना आकर्षित करण्यासाठी, मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करण्यासाठी, पुनर्विकासाच्या प्रलंबित कामांसाठी, किंवा दैनंदिन रेल्वे प्रवासाच्या यातनांसाठी मोर्चे का निघत नाहीत? राज्यात असे असंख्य प्रश्न आहेत. पण जिथे स्वार्थ, सत्ता आणि समाजमाध्यमांतून मिळणारी अवास्तव प्रसिद्धी मिळते, तिथेच आंदोलकांची गर्दी दिसते.

दिवसेंदिवस ही कृती वाढत चालली असून कोणीही उठतो आणि एखादा मुद्दा घेऊन साऱ्या यंत्रणांना वेठीस धरतो हे प्रकार राज्याला परवडणारे नाहीत. सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून हे मुद्दे जरी महत्वाचे असले तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून मोर्चे, आंदोलने, उपोषणे यासारखी आयुधे वापरली गेली तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होईल.

पण नेत्यांच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी, शक्तीप्रदर्शनासाठी आणि अवास्तव प्रसिद्धीसाठी जर ही आयुधे वापरली जात असतील तर ते राज्याच्या हिताचे नाही, हे नक्कीच.
 -पुरुषोत्तम कृष्णाजी आठलेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कजेर